
आर. के. फूड्स कंपनीत गहू वजनात ३६ टक्के तफावत; शेतकऱ्यांना मोबदला, कंपनीचे तीन वर्षांचे दप्तर ताब्यात
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळ येथे असलेल्या आर. के. फूड्स कंपनीत गहू खरेदी करताना शेतकऱ्यांच्या मालाच्या वजनात सुमारे ३६ टक्के तफावत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व वांधा समितीने तक्रारदार दोन शेतकऱ्यांना वाढीव ३६ टक्के मालाचा मोबदला मिळवून दिला असून कंपनीचे तीन वर्षांचे दप्तर ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच कंपनीविरुद्ध पोलिसात तक्रार देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दरम्यान तांत्रिक दोष आढळल्याने वजनमाप निरीक्षकांनी वजन काटा बंद करून दंडात्मक कारवाई केली आहे.
अमळनेर ते धुळे रस्त्यावरील मंगरूळ येथे असलेल्या आर. के. फूड्स कंपनीत शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करून त्यापासून आटा, पीठ, रवा, मैदा, सुजी आदी पदार्थ तयार केले जातात. मात्र १० रोजी दोन शेतकऱ्यांना आपल्या मालाच्या वजनात तफावत आढळल्याने त्यांनी बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर सभापती अशोक पाटील व बाजार समितीचे सचिव डॉ. उन्मेष राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली असता वजनात मोठी तफावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीने कंपनी व वजन काट्याला सील लावले.
यानंतर हे प्रकरण बाजार समितीच्या वांधा समितीसमोर ठेवण्यात आले. कंपनीचे मालक व संबंधित शेतकऱ्यांना समक्ष बोलावण्यात आले. दरम्यान वजनमाप निरीक्षक कुमारसिंग राजपूत यांनाही तक्रार करण्यात आली. राजपूत यांनी कर्मचाऱ्यांसमक्ष सील उघडून काट्याची तपासणी केली असता एका सेलची वायर तुटलेली आढळली. प्रत्यक्ष वजन करून पाहिल्यावरही वजनात तफावत आढळून आल्याने पंचनामा करून काटा बंद करण्यात आला. तसेच कंपनीला कारणे दाखवा नोटीस देत वजनमाप कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दुसरीकडे वांधा समितीचे अध्यक्ष सुरेश पिरण पाटील, सभापती अशोक पाटील, संचालक प्रा. सुभाष पाटील, डॉ. अनिल शिंदे, भोजमल पाटील, समाधान धनगर, हिरालाल पाटील, शरद पाटील, प्रकाश वाणी, वृषभ पारख व सचिव डॉ. उन्मेष राठोड यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. तपासात साधारणतः ३६ टक्के वजनात तफावत असल्याचे समोर आले. तक्रारदार दोन शेतकऱ्यांना व्यापारी योगेश वाणी यांच्याकडून जागेवरच मालाचा मोबदला देण्यात आला.
याशिवाय यापूर्वी माल मोजून गेलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीही ऐकून घेण्यात आल्या. शेतकरी, कर्मचारी व कंपनी यांच्या संयुक्त उपस्थितीत सीसीटीव्ही फुटेज तपासून शेतकऱ्यांच्या मालाचा अंदाज घेऊन तफावत किती आहे, यानुसार मोबदला कंपनीने अथवा खरेदीदार व्यापारी योगेश वाणी यांनी देण्याचा निर्णय सभापती अशोक पाटील यांनी दिला. तसेच कंपनीचे मागील तीन वर्षांचे दप्तर ताब्यात घेऊन त्याची तपासणी करून पुढील कारवाईसाठी पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply