
आषाढी एकादशीनिमित्त सावित्रीबाई फुले योगा ग्रुपची भक्तिमय दिंडी
अमळनेर (प्रतिनिधी) आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अमळनेर येथील माळीवाडा परिसरातील सावित्रीबाई फुले योगा ग्रुप यांच्या वतीने विठ्ठलभक्तीचा जागर आणि वारकरी परंपरेचे जतन करणारी भव्य पायी दिंडी उत्साहात व भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी तसेच वारकरी वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला भगिनींमुळे संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आत्मा असलेल्या वारकरी संप्रदायातून समता, बंधुता आणि भक्तीचा संदेश समाजात रुजावा तसेच हा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
माळीवाडा परिसरातून प्रारंभ झालेली ही दिंडी संत सखाराम महाराज वाडी संस्थान मंदिरात भक्तिमय वातावरणात पोहोचली. दिंडीत शंभरहून अधिक महिला वारकरी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. हातात टाळ-मृदंग, डोक्यावर तुळशीवृंदावन, कपाळावर गोपीचंदन आणि मुखी “ज्ञानबा-तुकाराम” तसेच “विठ्ठल… विठ्ठल…” या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या आकर्षक सादरीकरणामुळे दिंडीचे विशेष आकर्षण ठरले आणि नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. दिंडीदरम्यान पर्यावरण संवर्धन, स्त्री-सन्मान, सामाजिक एकोपा आणि समाजप्रबोधन यांसारख्या विषयांवर आधारित रिंगण सादर करण्यात आले. या सामाजिक संदेशांनी उपस्थित नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. भक्ती, संस्कार आणि सामाजिक प्रबोधनाचा सुंदर संगम घडविणारा हा दिंडी सोहळा सावित्रीबाई फुले योगा ग्रुप, माळीवाडा यांच्या पुढाकाराने यशस्वीरीत्या पार पडला. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे वारकरी परंपरेचे संवर्धन होण्याबरोबरच समाजात सकारात्मक विचारांचा प्रसार होत असल्याची भावना व्यक्त केली.

Leave a Reply