
मयत लाभार्थ्यांच्या नावे धान्य उचलून लाखोंचा अपहार ; दहिवदच्या दोन रेशन दुकानदारांवर गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद येथील दोन रेशन दुकानदारांनी मयत लाभार्थ्यांच्या नावे तसेच मंजूर क्षमतेपेक्षा अधिक लाभार्थी दाखवून २०१२ ते २०१६ या कालावधीत सुमारे ९ लाख ६२ हजार रुपयांच्या गहू-तांदळाचा अपहार केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांच्यानुसार या प्रकरणाची अधिक माहिती अशी की दहिवद येथील रेशन दुकान क्रमांक १४५ चे चालक रमेश काशीनाथ पाटील आणि दुकान क्रमांक १४६ च्या कोकीळाबाई वासुदेव माळी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, रमेश पाटील यांनी अंत्योदय योजनेतील सुमनबाई मच्छींद्र पाटील, गुणवंताबाई आत्माराम माळी व सोनाबाई देवचंद माळी या मयत लाभार्थ्यांच्या नावे धान्य उचलले. तसेच मंजूर क्षमतेपेक्षा अधिक १३ लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करून त्यांच्या नावेही गहू व तांदूळ उचलल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांनी अंत्योदय योजनेअंतर्गत ८५ हजार ३३४ रुपयांचे २ हजार २४० किलो गहू-तांदूळ, तर बीपीएल योजनेतून ३ लाख ६६ हजार ४१२ रुपयांचे ९ हजार ६०० किलो धान्याचा अपहार केल्याचा आरोप आहे. तर कोकीळाबाई माळी यांनीही मयत मनकरणाबाई दगडू शेटे यांच्या नावे धान्य उचलल्याचे तसेच काही व्यक्तींची नावे बीपीएल यादीत नसतानाही त्यांच्या नावे धान्य घेतल्याचे आढळून आले. काही लाभार्थ्यांना नियमानुसार धान्य वाटप न केल्याचाही आरोप आहे.
त्यांनी अंत्योदय योजनेत ७० हजार ६६७ रुपयांचे १ हजार ८५५ किलो गहू-तांदूळ, तर बीपीएल योजनेत ४ लाख ३९ हजार ९९६ रुपयांचे ११ हजार ५२० किलो धान्याचा अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये मिळून ९ लाख ६२ हजार १०८ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. या संदर्भात श्यामकांत जयवंतराव पाटील यांनी पुराव्यांसह तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर संबंधित दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले होते. मात्र गुन्हे दाखल न झाल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना जमाल शेख यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमे तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

Leave a Reply