
नगाव बुद्रुक येथे मध्यरात्री भीषण अपघात; ट्रॅक्टरखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी ): तालुक्यातील नगाव बुद्रुक येथे मध्यरात्री ट्रॅक्टरखाली चिरडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १४ मे रोजी पहाटे २:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नामदेव देवराम सोनवणे (वय ७६, रा. देवगाव आमोदे, ता. जळगाव) हे आपल्या जावई सुकलाल उर्फ छोटू काशिनाथ कोळी (रा. नगाव बुद्रुक, ता. अमळनेर) यांच्या घरी आले होते. दरम्यान, ते घरासमोरील दहिवद-देवळी काँक्रीट रस्त्यावर घरापासून सुमारे ४० ते ५० फूट अंतरावर झोपलेले होते.
पहाटे सुमारे २:३० वाजेच्या सुमारास सासऱ्यांचा जोरात ओरडण्याचा आवाज आल्याने जावई सुकलाल कोळी जागे झाले. बाहेर येऊन पाहिले असता नामदेव सोनवणे यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याचे निदर्शनास आले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.
यानंतर सुकलाल कोळी यांनी आरडाओरडा करून मुलगा मनोज व इतर ग्रामस्थांना गोळा केले. त्यांनी संबंधित ट्रॅक्टरचा पाठलाग केला असता खालच्या गावात ट्रॅक्टर उभा आढळून आला. तो ट्रॅक्टर दीपक सुरेश पाटील याचा असून तोच ट्रॅक्टर चालवत असल्याचे समोर आले. मात्र, ट्रॅक्टर उभा करून चालक घटनास्थळावरून पसार झाला होता.
गंभीर जखमी अवस्थेत नामदेव सोनवणे यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी दीपक सुरेश पाटील याच्याविरोधात अमळनेर पोलिस स्टेशन येथे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

Leave a Reply