शेतरस्त्यांचे होणार मॅपिंग; सातबाऱ्यावरही होणार नोंद : आमदार अनिल दादा पाटील

अमळनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर; २० हजार ९२९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

 

अमळनेर (प्रतिनिधी) राज्यातील शेतकऱ्यांसमोरील सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे शेतरस्त्यांचा असून, हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर आपली नियुक्ती करण्यात आली असून, राज्यभरातील शेतरस्त्यांचे मॅपिंग केले जाणार आहे. यामुळे प्रत्येक शेतरस्ता नकाशावर दिसेल आणि त्याची सातबाऱ्यावरही अधिकृत नोंद होईल. या कामासाठी राज्य शासनाने तब्बल २ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल दादा पाटील यांनी दिली.

महसूल विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. २५) इंदिरा भवन येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शिबिरात विविध शासकीय विभागांचे ५६ स्टॉल उभारण्यात आले होते. प्रारंभी स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांना अभिवादन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार अनिल भैदास पाटील यांनी समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तात्काळ आणि जागेवर मार्गी लागत असल्याचे सांगितले. तसेच संपूर्ण अमळनेर तालुक्याचा पोखरा योजनेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याची बचत करावी, असे आवाहन त्यांनी केले. शासनाकडून चाऱ्यासाठी मोफत बियाण्यांचे वितरण सुरू असून त्याची लागवड करून पशुधनासाठी चाऱ्याचा साठा करून ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.

माजी आमदार तथा कृषिभूषण साहेबराव पाटील यांनीही शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देत त्यासाठीच्या नियमांचे स्पष्टीकरण केले. कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा जयश्रीताई पाटील, उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पारोळा तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, नायब तहसीलदार सी. यू. पाटील, अजय कुलकर्णी, प्रशांत धमके,  पुरवठा अधिकारी रुकसाना शेख, अमोल पाटील, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, भागवत पाटील, विक्रांत पाटील, अनिल शिसोदे, सचिन पाटील, गणेश भामरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिबिरात महसूल विभागामार्फत शेतरस्ता नोंदीचे सातबारा उतारे, कुंभार व्यावसायिकांना डिजिटल ओळखपत्रे, विविध शासकीय योजनांचे लाभ, अंगणवाडी सेविकांना गॅस जोडणी, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य, वनविभागामार्फत वन्यप्राण्यांच्या नुकसानीची भरपाई धनादेश, पंचायत समितीमार्फत घरकुल योजनेचे लाभ, शेती साहित्य, नगरपरिषदेच्या घरकुल योजना व बांधकाम परवानगीपत्रे, बचतगटांना धनादेश, पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी, गाय व म्हैस वाटप, वैरण बियाणे, महिला व बालविकास विभागामार्फत मातृवंदना योजना आणि बेबी केअर किट, तसेच महावितरणकडून अंगणवाड्यांना वीज जोडणी व सौरपंप अशा विविध योजनांचा २ हजार ४९६ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ देण्यात आला. या शिबिराच्या माध्यमातून एकूण २० हजार ९२९ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांनी केले. सूत्रसंचालन संजय पाटील आणि वसुंधरा लांडगे यांनी केले, तर आभार डॉ. उल्हास देवरे यांनी मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *