
अमळनेरचा ‘डॉक्टर’ नगराध्यक्ष; पण नगरपालिका व्हेंटिलेटरवर!
“डॉक्टरसाहेब, पेशंट तपासत असताना नगरपालिकेची नाडी का मंदावली?”
अमळनेर (विशेष प्रतिनिधी) अमळनेरकरांनी मोठ्या विश्वासाने, “डॉक्टर आहेत” म्हणून ज्यांच्या हातात शहराची सूत्रे दिली, त्या नगराध्यक्षांकडून शहराच्या जखमा भरून निघतील, विकासाची नवी पहाट उगवेल, अशी अपेक्षा होती. पण आज परिस्थिती इतकी वेदनादायी झाली आहे की, नगरपालिकेलाच व्हेंटिलेटरवर ठेवले आहे की सलाईनवर, हेच जनतेला कळेनासे झाले आहे! नगरपालिकेची निवडणूक होऊन दोन महिने उलटले आहे. तरीही कारभार सुरळीत सुरू झालेला नाही.त्यात नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम होत नसल्याचीही ओरड आहे.
खरे पाहता “डॉक्टर, डॉक्टर” म्हणून निवडून आलेल्या नगराध्यक्षांनी नगरपालिकेची नुसती सर्जरी करायची नव्हती, तर शहराच्या विकासाला नवी दिशाही द्यायची होती. परंतु गेल्या दोन महिन्यांत एकही ठोस निर्णय, एकही भरीव काम, एकही आश्वासक पाऊल दिसले नाही. त्यांची प्रशासनावर पकड नाही, कामकाजाची दिशा नाही आणि नागरिकांच्या प्रश्नांचे भानही नाही, अशी अवस्था आज अमळनेरची झाली आहे.खरे पाहता बाहेरगावी बस्तान मांडलेल्या या नगराध्यक्षांना ना अमळनेकरांची ओळख आहे, ना त्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे!नुकतेच काही तरुण शिवजयंतीसाठी वर्गणी मागायला गेले असता, त्यांनी केवळ नकारच दिला नाही, तर उद्विग्न प्रतिक्रिया देऊन नागरिकांचा आणि शिवरायांचाही अपमानच केला. तुम्ही अमळनेरकरांचे दायित्व घेतले आहे, म्हणून अशा पद्धतीने उत्तरे देणे हा जनतेचा सन्मान आहे का?सण उत्सव साजरे करण्याची अमळनेरची परंपरा असून यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून योगदान व प्रोत्साहन देणे कर्तव्य ठरते. सुरवातीला कधी अमळनेर, तर कधी जळगाव, असे पार्टटाईम पद्धतीने काम करणारे नगराध्यक्ष म्हणून त्यांची ओळख झाली. याबाबत खबरीलालने प्रकाश टाकला. जनतेच्या लक्षात आणून दिले. या उघडकीस आलेल्या प्रकाराच्या चर्चांनंतर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आणि त्यानंतर जळगावला जाणे त्यांनी बंद केले. असे सांगितले जाते की, अमळनेरात त्यांचे घर आहे. पण खरंच घर आहे की नाही, याबद्दलही संभ्रम आहे. त्यांच्या घरासमोरच नातेवाईक, पाहुणे राहतात आणि तेच नगरपालिकेच्या कामांबाबत त्यांना सल्ले देतात त्यामुळे पाहुणे आणि नातेवाइकांना कंटाळून ते दुसऱ्याच्या दारी आसरा घेत असल्याची चर्चा आहे.आपले घर, पाहुणे आणि नातेवाईकांसोडून दुसऱ्याच्या घरी नगराध्यक्ष साहेबांना आसरा घ्यावा लागत असेल तर हे त्यांचे आणि अमळनेरकरांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.आपले घरदार परके केल्याने ते आता कोणाच्या दारी आसरा घेत आहेत, हे अमळनेकरांनीच शोधून काढावे.या महाशयांना प्रशासकीय कामाचा कोणताही अनुभव नसल्याने काही अधिकारी बदलीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत. सर्वसामान्यांचे काम होत नाही, कार्यालयीन गोंधळ वाढत चालला आहे. कोणत्याही विषयाचे ठोस ज्ञान नाही, निर्णयक्षमतेचा अभाव आहे, अशी भावना जनतेत वाढत आहे.
यावर कळस म्हणजे निर्णय क्षमता नसल्याने आणि आता मार्च अखेरला मोठा कर जमा होत असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार हे नगराध्यक्ष महोदय आता एक-दोन महिन्यांच्या रजेवर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तेही परदेश दौर्यासाठी! नगराध्यक्ष रजेवर म्हणजे कामे रखडणार, आणि अमळनेरकर वाऱ्यावर? हेच का जनतेने दिलेल्या कौलाचे फळ? जनतेने लोकशाही पद्धतीने निवड केली आहे, नगराध्यक्षपद हे केवळ सत्कार स्वीकारण्याचे आणि सन्मानाचे आसन नाही तर ती जनतेची जबाबदारी आहे!येथे झिजावेही लागते.केवळ खुर्च्या मोडून चालत नाही.
जनसेवेचे आमचे व्रत असल्याने आम्ही तुम्हाला जागे करून जनतेची कामे करायला भाग पाडणार आहोत.तुम्हाला अमळनेरकर आज एकच प्रश्न विचारत आहेत.“डॉक्टरसाहेब, पेशंट तपासत असताना नगरपालिकेची नाडी का मंदावली?” तूर्तास एवढेचं….

Leave a Reply