
धार येथे महिलेला मारहाण व विनयभंग; मद्यधुंद इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धार येथे एका महिलेला विनाकारण शिवीगाळ करून मारहाण तसेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना २ मे रोजी सकाळी सुमारे साडेनऊ वाजता घडली. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या घराच्या गॅलरीमध्ये नातीला फिरवत असताना धार येथील अनिल नामदेव पाटील हा मद्यधुंद अवस्थेत तेथे आला. त्याने कोणत्याही कारणाविना महिलेशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. महिलेनं त्याला शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता, त्याने अयोग्य भाषा वापरत धमकी दिली की “माझा मुलगा तुझी मुलगी पळवून घेऊन गेला, मीही कोणालाही पळवून नेईन.” यानंतर त्याने महिलेचा हात धरून तिला जबरदस्तीने अंगावर ओढले. या झटापटीत महिलेच्या कुर्त्याची बाही फाटल्याने तिचा विनयभंग झाला आणि तिला मानसिक धक्का बसला. या प्रकारामुळे परिसरातही एकच खळबळ उडाली. घटनेनंतर संबंधित महिलेने मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अनिल नामदेव पाटील याच्याविरुद्ध विनयभंगासह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply