
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका; ५० वाहनांवर कारवाई, ५४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि ‘शून्य अपघात संकल्प’ प्रभावीपणे राबविण्यासाठी अमळनेर वाहतूक पोलिसांनी शहरातील तसेच शहराबाहेरील प्रमुख मार्गांवर विशेष नाकाबंदी मोहीम राबवत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई केली. या मोहिमेत सुमारे ८० ते ९० वाहनांची तपासणी करण्यात आली असून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५० वाहनांवर कारवाई करून एकूण ५४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शून्य अपघात संकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी वाहतूक शाखेला विशेष निर्देश दिले होते. त्यानुसार वाहतूक पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय बोरसे, रवींद्र बोरसे आणि संजय सोनवणे यांनी गलवाडे रस्ता, नाट्यगृह परिसर, भागवत रस्ता, धुळे रस्ता आदी ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली. या कारवाईदरम्यान ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या तरुणांच्या ६ वाहनांवर प्रत्येकी १ हजार रुपये प्रमाणे ६ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. वाहन परवान्याविना वाहन चालवणाऱ्या २ जणांकडून १ हजार रुपये, तुटलेल्या नंबर प्लेट असलेल्या २ वाहनांकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच वाहन चालविताना भ्रमणध्वनीवर बोलणाऱ्या ५ वाहनचालकांकडून ५ हजार रुपये, पोलिसांच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या एका वाहनचालकाकडून ५०० रुपये, विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या ५ जणांकडून ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या १९ वाहनांवर १२ हजार रुपयांची कारवाई करण्यात आली. अवैध वाहन परवाना वापरणाऱ्या ४ चालकांकडून तब्बल २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर ५०० रुपये, काळी फ्रेम लावणाऱ्या वाहनचालकावर ५०० रुपये, रिफ्लेक्टर नसलेल्या ३ वाहनांवर ३ हजार रुपये तसेच कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावलेल्या बुलेट चालकावर ५०० रुपयांचा दंड करण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत एकूण ५० वाहनांवर कारवाई करून ५४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून संबंधित अहवाल पुढील कार्यवाहीसाठी न्यायालयात पाठविण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून अपघातमुक्त अमळनेर घडविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply