अंधाराचा फायदा घेत चुकीच्या तरुणाला बेदम मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा

अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील मंगरूळ येथे कानबाई मिरवणुकीदरम्यान अंधाराचा गैरफायदा घेत एका तरुणाला मारहाण करण्याच्या नादात दुसऱ्याच तरुणाला बेदम मारहाण करून बेशुद्ध केल्याची धक्कादायक घटना १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगरूळ येथे कानबाईची मिरवणूक सुरू असताना श्रीकृष्ण चौक परिसरात काही तरुणांनी एका व्यक्तीस मारहाण केल्याची घटना घडली. मिरवणुकीदरम्यान लाईट बंद झाल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काहींनी वाळू फेकल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याच गोंधळाचा आणि अंधाराचा फायदा घेत काही जणांनी नितीन सुरेश कुंभार याला लक्ष्य करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण इतकी गंभीर होती की नितीन कुंभार हा घटनास्थळीच बेशुद्ध पडला. दरम्यान, विक्की संजय पाटील याने जखमी तरुणाचे वडील सुरेश सजन कुंभार यांना जाऊन त्यांच्या मुलाला मारहाण होऊन तो बेशुद्ध पडल्याची माहिती दिली. त्यानंतर सुरेश कुंभार यांनी संबंधितांकडे जाब विचारला असता, “आम्हाला दुसऱ्या व्यक्तीला मारायचे होते; मात्र अंधारामुळे चुकून यालाच मार लागला,” असे सांगण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी सुरेश सजन कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल शरद पाटील, शेखर मनोहर पाटील, रवींद्र हिलाल पाटील यांचा मुलगा, संतोष बापू पाटील यांचा मुलगा, वसंत लुकडू पाटील यांचा मुलगा आणि विक्की बाळू पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), १८९(२), १९०, १९१(२), ११५, ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *