
पिळोदा ग्रामसभेत ‘बालविवाहमुक्त ग्राम’चा एकमताने ठराव; जनजागृतीसह सामूहिक शपथ
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिळोदा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावाला ‘बालविवाहमुक्त ग्राम’ करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी एकमताने केला. बालविवाह रोखण्यासाठी नागरिक, महिला, युवक, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच विविध विभागांच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत ग्रामपंचायत सभेत ठरावही मंजूर करण्यात आला.
यावेळी आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेरच्या जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या प्रकल्पांतर्गत बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमात बालविवाहाचे दुष्परिणाम, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच बालकांच्या हक्कांबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेरच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील, संचालक रेणू प्रसाद, जस्ट राईट फॉर चिल्ड्रन प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर, समाधान पाटील तसेच श्रम साफल्या एज्युकेशनचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी बालविवाहाच्या दुष्परिणामांवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. पथनाट्यातून बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भवितव्यावर होणाऱ्या परिणामांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. तसेच बालविवाहाची माहिती मिळाल्यास संबंधित यंत्रणेला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी गावात बालविवाह होऊ न देण्याची तसेच मुला-मुलींना शिक्षणाची संधी देण्याची सामूहिक शपथ घेतली. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे पिळोदा गावाला बालविवाहमुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

Leave a Reply