
हेडावे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाची कडक भूमिका; सरपंच, ग्रामसेवकासह पाच जणांना नोटीस
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील हेडावे येथील ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार व गैरव्यवहाराच्या प्रकरणात न्यायालयाने कडक भूमिका घेतली असून, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भाऊराव पाटील यांनी दाखल केलेल्या प्रकरणात सरपंच व ग्रामसेवक यांच्यासह लोकसेवक म्हणून काम करणाऱ्या पाच जणांना नोटीस काढण्याचा अंतिम आदेश दिला आहे.
न्यायालयाने आपल्या आदेशात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १७५ (३) आणि १७५ (४) नुसार लोकसेवकाविरुद्ध तक्रार आल्यास त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा अहवाल घेणे अनिवार्य असल्याचे नमूद केले आहे. तक्रारदाराने केलेल्या आरोपांबाबत वस्तुस्थिती व परिस्थितीचा संपूर्ण अहवाल सादर करण्यासाठी गटविकास अधिकारी, अमळनेर यांना नोटीस काढण्याचे आदेश देण्यात आले असून, सद्य अर्जाची प्रत गटविकास अधिकाऱ्यांना पाठवून त्यांचा अहवाल मागवण्यात यावा, असेही आदेशात नमूद आहे. तसेच ग्रामसेवक पदावर काम करणाऱ्या लोकसेवकांना नोटीस काढून तक्रारदाराने केलेल्या आरोपांबाबत त्यांचे म्हणणे मागवण्यात यावे. सद्य अर्जाची प्रत व प्रतिज्ञापत्र नोटीससोबत पाठवण्यात यावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे हेडावे ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवकांसह पाचही संबंधित अधिकाऱ्यांना न्यायालयात आपली बाजू मांडावी लागणार आहे. गटविकास अधिकाऱ्यांचा अहवाल आणि संबंधितांचे म्हणणे प्राप्त झाल्यानंतर पुढे गुन्हा दाखल करण्याबाबत न्यायालय निर्णय देणार आहे. या आदेशामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply