सचिव म्हणतात ठराव झाला, तर सहा संचालकांचा दावा ‘बैठकच झाली नाही’

सबगव्हाण विकास सोसायटीच्या ठरावावरून संभ्रम निर्माण

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील सबगव्हाण विकास सोसायटीच्या जिल्हा बँकेसाठीच्या प्रतिनिधी ठरावावरून संभ्रम निर्माण झाला आहे. सोसायटीचे सचिव ठराव झाल्याचे सांगत असताना चेअरमनसह सहा संचालकांनी बैठकच झाली नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नेमका कोणता ठराव ग्राह्य धरला जाणार, याकडे सहकार विभागाचे लक्ष लागले आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या २०२६ ते २०३१ या कालावधीतील निवडणुकीसाठी विकास सोसायट्यांकडून प्रतिनिधींचा ठराव २ सप्टेंबरपर्यंत सहाय्यक निबंधकांकडे मागविण्यात आला होता. मात्र, सबगव्हाण येथील विकास सोसायटीच्या ठरावाबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने प्रक्रिया रखडली होती.

२९ ऑगस्ट रोजी ठराव करण्यासाठी सोसायटीच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता वैद्यकीय कारणामुळे सचिव या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. दुसरीकडे, आपल्याकडे बहुमत असल्याने सहाय्यक निबंधक तसेच जिल्हा निबंधक यांना दूरध्वनीवरून माहिती कळविल्याचे चेअरमनसह सहा संचालकांनी सहकार आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सोसायटीच्या ११ पैकी सहा संचालक आपल्याकडे असल्याने आपल्यापैकी एकाचा ठराव ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच खोट्या सह्या अथवा अन्य गैरप्रकार करून कोणी ठराव करण्याचा प्रयत्न केल्यास तो ठराव ग्राह्य धरू नये, अशी मागणीही संबंधित कार्यालयांना कळविण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर चेअरमन सूर्यकांत पाटील तसेच संचालक रतिलाल पाटील, भगवान पाटील, भरत पाटील, भटू पाटील आणि भाऊसाहेब पाटील यांच्या सह्या आहेत.

सबगव्हाण येथील ठरावाबाबत जिल्हा उपनिबंधक अधिकारी, जळगाव येथील महेश गायकवाड यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्यांना या ठरावाबाबत माहिती नाही. त्यांच्याकडे आलेले ठराव नाशिक कार्यालयाकडे पाठविण्यात आले असून याबाबत अमळनेर येथील सहाय्यक निबंधक व्ही. एम. जगताप यांच्याकडे विचारणा करण्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अमळनेर येथील सहाय्यक निबंधक व्ही. एम. जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, सचिव विजय पाटील यांनी आणून दिलेल्या कागदपत्रांमध्ये ठराव होता. तो ठराव पुढील कार्यवाहीसाठी जळगाव कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून तेथून तो नाशिक येथील सहकार आयुक्त कार्यालयात गेल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

 

सहा विरुद्ध पाच मतांनी अविनाश पाटील यांचा ठराव मंजूर

 

“२९ रोजी बैठक झाली असून सहा विरुद्ध पाच मतांनी अविनाश भीमराव पाटील यांचा ठराव मंजूर करण्यात आला असून तो जिल्हा उपनिबंधकाकडे पाठवण्यात आला आहे.”

विजय पाटील, सचिव वि का सोसायटी सबगव्हाण ता. अमळनेर 

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *