दीपक महाजन यांची राज्यस्तरीय विज्ञान-गणित शिक्षक प्रशिक्षणासाठी निवड

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी कन्या हायस्कूलचे उपशिक्षक दीपक रामभाऊ महाजन यांची आंध्रप्रदेशातील कुप्पम येथील अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन येथे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षणासाठी अधिकृत निवड झाली आहे.

शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या उच्चस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील निवडक शिक्षकांना ‘कृतीयुक्त शिक्षणातून ज्ञानरचनावाद’ या विषयांतर्गत आधुनिक शैक्षणिक तंत्रांचे प्रशिक्षण या वर्गात दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण २२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार असून, जळगाव जिल्ह्यातून दीपक रामभाऊ महाजन यांची निवड झाली आहे. या प्रशिक्षणातून मिळणाऱ्या आधुनिक शैक्षणिक पद्धतींचा उपयोग साने गुरुजी कन्या हायस्कूलमधील इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींना विज्ञान व गणित विषय अधिक सोप्या, कृतीयुक्त आणि रंजक पद्धतीने शिकविण्यासाठी होणार आहे. या उल्लेखनीय निवडीबद्दल अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करून दीपक रामभाऊ महाजन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, संचालक गुणवंतराव पाटील, ॲड. अशोक बावीस्कर, डॉ. एस. जे. शेख, किरण पाटील आणि दीपक सोनवणे यांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले. तसेच साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, मनीष उघडे, संजय जगताप आणि हितेश पाटील यांनी दीपक महाजन यांना शुभेच्छा दिल्या.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *