अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात ३० जूनला मुंबईत विराट मोर्चा; अमळनेरात चर्मकार समाजाची नियोजन बैठक

अमळनेर (प्रतिनिधी) शासनाने अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने अनुसूचित जातींवर मोठा अन्याय होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने ३० जून रोजी मुंबई येथे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी अमळनेर शहर व ग्रामीण चर्मकार समाज बांधवांची पूर्वनियोजित बैठक शनिवारी अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीत शासनाने समाजबांधवांना विश्वासात न घेता अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. उपवर्गीकरणाची मागणी कुणीही केलेली नसताना शासन हा निर्णय का आणि कुणासाठी घेत आहे, असा सवाल उपस्थित करत हा निर्णय अनुसूचित जातींवर अन्याय करणारा असल्याचा आरोप करण्यात आला.

या निर्णयाच्या निषेधार्थ ३० जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील अनुसूचित जाती समाजबांधव मुंबई येथे विराट मोर्चा काढणार असून, राष्ट्रीय चर्मकार महासंघही त्यात सहभागी होणार आहे. त्यानिमित्ताने आयोजित बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, राष्ट्रीय प्रवक्ते पांडुरंग विसावे, नगरसेविका अंजली विसावे तसेच अमळनेर शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते. मोर्चात सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भानुदास विसावे व पांडुरंग विसावे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बिऱ्हाडे यांनी केले. बैठकीस समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *