मंगरूळ तलावाजवळ मृत्यूचा सापळा, रेलिंग तुटल्याने मोठ्या अपघाताची भीती

अमळनेर (प्रतिनिधी) : पिंपळे–आरडी–जवखेडा–मोहाडी–नवनगर–वाघोदा मार्गावरील मंगरूळ तलावाजवळ नाल्यावर बसविण्यात आलेले संरक्षण रेलिंग तुटल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि रात्रीच्या वेळी अपुरी दृश्यमानता असल्याने येथे मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली असून संबंधित बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगरूळ तलावाजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यावरील रेलिंग तुटून गेले असून त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गावर पिंपळे, आरडी, जवखेडा, मोहाडी, नवनगर, वाघोदा, निसरडी, खडके यांसह परिसरातील अनेक गावांची दैनंदिन वाहतूक सुरू असते. त्यामुळे हा मार्ग अत्यंत वर्दळीचा मानला जातो. विशेषतः रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे रस्त्याच्या कडेला असलेला नाला आणि तुटलेले रेलिंग सहजपणे दिसून येत नाही. परिणामी वाहन थेट नाल्यात जाण्याचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा या समस्येकडे लक्ष वेधले असले तरी अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. एखादा अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तुटलेले रेलिंग त्वरित दुरुस्त करून त्या ठिकाणी मजबूत संरक्षण कठडे बसविण्यात यावेत, तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक इशारा फलक व परावर्तित चिन्हे लावावीत, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *