अमळनेरात तरुणीचे खासगी फोटो-व्हिडीओ व्हायरल; तरुणाविरुद्ध विनयभंगासह आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा

अमळनेर (प्रतिनिधी) : खासदारांच्या सभेचे चित्रीकरण करण्यासाठी दिलेल्या मोबाईलमधील एका तरुणीचे खासगी फोटो व व्हिडीओ चोरून स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ते व्हायरल केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध विनयभंगासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे. निकेश उर्फ राज पाटील असे संशयित आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी अमळनेर येथील स्वामीनारायण मंदिरासमोर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका तरुणीने सभेचे चित्रीकरण करण्यासाठी आपला मोबाईल निकेश उर्फ राज पाटील याच्याकडे दिला होता. मोबाईलचा पासवर्डही त्याला देण्यात आला होता.

याच संधीचा गैरफायदा घेत आरोपीने तरुणीच्या मोबाईल गॅलरीतील खासगी फोटो व व्हिडीओ स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रीत करून घेतल्याचा आरोप आहे. जानेवारी महिन्यात अविनाश चौधरी यांनी संबंधित तरुणीला तिचे अश्लील स्वरूपाचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याची माहिती दिली. त्यानंतर चौकशी केली असता तिच्या मोबाईलमधीलच व्हिडीओ बाहेर गेल्याचे समोर आले.

सभेतील छायाचित्रांच्या आधारे निकेश उर्फ राज पाटील याचा शोध घेण्यात आला. त्याच्या मोबाईलमधून संबंधित व्हिडीओ डिलीट करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. घाबरलेल्या तरुणीने सुरुवातीला ही बाब आई-वडिलांना सांगितली नव्हती. मात्र १६ मे रोजी पुन्हा संबंधित व्हिडीओ निलेश भांडारकर यांच्या मोबाईलमध्ये आढळून आल्यानंतर त्यांनी पीडितेच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पीडितेला खात्री झाली की हे व्हिडीओ निकेश उर्फ राज पाटील यानेच व्हायरल केले आहेत.

पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६५, ६६, ६६(ई), ६७ आणि ६७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम स्वतः करीत आहेत.

 

“या प्रकरणात कोणतीही गय केली जाणार नाही…पो.नि. निकम

 

 दरम्यान, या प्रकरणात आणखी काही नावे समोर आली असून व्हिडीओ पुढे व्हायरल करणाऱ्या व्यक्तींचीही पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. लवकरच संबंधित आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. “या प्रकरणात कोणतीही गय केली जाणार नाही. संबंधित व्हिडीओ कोणी पुढे पाठवले, व्हायरल केले किंवा प्रसारित केले याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करण्यास मदत होईल,” असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *