भूमी सुपोषण चळवळ जनजागराची जबाबदारी सर्वांचीच, महाशोभायात्रेत सहभागाचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) भूमी सुपोषण चळवळ जनजागराची जबाबदारी सर्वांचीच असून समाजातील सर्वच क्षेत्रांतील घटकांनी महाशोभायात्रेत सहभागाचे आवाहन मान्यवरांकडून करण्यात आले. अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या वतीने ‘माझा संकल्प-भूमी सुपोषण’ जनजागरणासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत बुधवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी अमळनेर शहरात महाशोभायात्रा काढण्यात येणार असून, येथील श्री मंगळग्रह मंदिर येथे रविवारी आयोजन-नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजातील सर्व घटक व माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. महाशोभायात्रेचा मार्ग, सहभाग, जनजागृतीपर घोषवाक्ये आदींबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिलदादा पाटील होते. प्रमुख उपस्थितीत खासदार स्मिताताई वाघ, माजी आमदार साहेबरावदादा पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, डॉ. एच. डी. जाधव, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी, महिला बचत गट, सरपंच-उपसरपंच व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी भूमी सुपोषण चळवळीची सविस्तर माहिती दिली. 19 मार्च  रोजी वर्षप्रतिपदेच्या दिवशी भूमी माता पूजनाचा मुख्य कार्यक्रम होणार असून, देशव्यापी चळवळीची सुरुवात अमळनेर येथून होत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा : खासदार स्मिताताई वाघ

 

रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेकी वापर झाल्याने जमिनीचा कस कमी होत असल्याची खंत व्यक्त करत खासदार स्मिताताई वाघ यांनी सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्याची गरज अधोरेखित केली. “भूमी सुपोषण ही काळाची गरज आहे. 19 मार्च 2026 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.

 

अमळनेरचे नाव देशपातळीवर पोहोचावे  : आमदार अनिलदादा पाटील

 

भूमी सुपोषण जनजागर चळवळीची सुरुवात श्री मंगळग्रह मंदिरातून होत असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी व्यापक जनजागृतीचे आवाहन केले. ग्रामीण भागातील सरपंच, विविध कार्यकारी संस्था व पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धुळे व जळगाव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होतील, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

 

कार्यक्रम अभूतपूर्व करावा :  माजी आमदार साहेबरावदादा पाटील

 

“भूमीचे सुपोषण नसल्याने समाज कुपोषित होत आहे. मातीला मातेचा दर्जा देणे आवश्यक आहे,” असे सांगत त्यांनी 18 फेब्रुवारीच्या महाशोभायात्रेत आणि 19 मार्चच्या मुख्य कार्यक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

 

स्मृती (स्व.) अजितदादांच्या…

 

श्री मंगळग्रह मंदिरासाठी 15 एकर जागा (स्व.) अजितदादांच्या पुढाकारामुळे उपलब्ध झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंदिर परिसरात स्मारकात्मक उपक्रम राबविण्याची योजना असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या कार्यास बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *