संत सखाराम महाराज वाडी संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी १५ कोटींची मागणी

आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

अमळनेर (प्रतिनिधी)  अमळनेरचे आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी ३ जुलै रोजी मुंबई येथील विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प.पू. संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथे लागलेल्या भीषण आगीची माहिती दिली. तसेच मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी विशेष बाब म्हणून १५ कोटी रुपये निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आमदार पाटील यांनी नमूद केले आहे की,  खान्देशचे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सद्गुरू संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला १ जुलै २०२६ रोजी रात्री भीषण आग लागून सुमारे २५० वर्षे जुना ऐतिहासिक लाकडी गाभारा पूर्णपणे जळून खाक झाला. या दुर्घटनेत अंदाजे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गाभाऱ्याचे वैभव आगीत नष्ट झाले असले तरी मंदिर व मूर्ती सुरक्षित राहिल्या असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आगामी २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असून दरवर्षी खान्देशासह विविध भागांतून हजारो वारकरी आणि भाविक येथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी येतात. सुमारे २५० वर्षांची परंपरा असलेले हे पुरातन लाकडी मंदिर आगीत नष्ट झाल्याने लाखो वारकरी आणि भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिराचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून पर्यटन अथवा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत शासनाने प्रस्ताव मागवावा आणि सुमारे १५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून संस्थानाची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली आहे.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासन या विषयावर सकारात्मक भूमिका घेईल, अशी ग्वाही आमदार अनिल भाईदास पाटील यांना दिली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *