श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे आज महाशिवरात्रीपासून १५ दिवसीय भव्य यात्रोत्सवाची होणार सुरुवात

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीपासून खान्देशातील सर्वात मोठ्या पंधरा दिवसीय यात्रोत्सवाला रविवारी प्रारंभ होत आहे. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त धुळे व जळगाव जिल्ह्यातील निरंकारी भजनी मंडळाकडून सलग १५ दिवस शिवजागर केला जातो. दुसऱ्या दिवशी मांत्रिक-तांत्रिक तापी नदीत स्नान करून सवाद्य कपिलेश्वराचे दर्शन घेतात. धार्मिक ग्रंथांनुसार कपिलमुनींनी येथे यज्ञकर्म व तपश्चर्येची सुरुवात करून दीर्घकाळ योगसाधना केली. ‘कपिला’ नावाची गाय त्यांच्या साधनेदरम्यान त्यांच्या शेजारी बसत असे, अशी आख्यायिका आहे. त्यावरूनच येथे त्रिपिंडी महादेवाची स्थापना झाल्याचे सांगितले जाते. मंदिर परिसरातील दीपमाळ व तटबंदीवर संस्कृत व मोडी लिपीतील शिलालेख आजही पाहायला मिळतात.

यात्रात्सव निमित्ताने होणाऱ्या गर्दीवर नियंत्रणासाठी मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जीभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व पुरुष पोलीस कर्मचारी १५ दिवस कार्यरत राहतील. मंदिर संस्थानतर्फे महिला स्वयंसेवक सुलभ दर्शनासाठी मदत करणार आहेत. महाशिवरात्रीपासून सुरू होणाऱ्या या यात्रोत्सवासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रशासन आणि मंदिर संस्थान सज्ज झाले आहे.

 

ऐतिहासिक वास्तूशिल्प

 

१७ व्या शतकात थोर समाजसेविका अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे शिलालेखात नमूद आहे. हेमाडपंथी पद्धतीने काळ्या पाषाण दगडांत उभारलेले हे पूर्वाभिमुख मंदिर १८ दगडी खांबांवर आधारित भव्य सभामंडप, तीन घुमट व मध्यवर्ती गाभाऱ्यासह आकर्षक बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. समोर २१ फूट उंच दगडी दीपमाळ असून दररोज सकाळी सूर्यकिरणे थेट पिंडीवर पडण्याचा विलक्षण क्षण भाविकांना अनुभवता येतो. मंदिराच्या डावीकडे श्रीराम मंदिर, समोर हनुमान मंदिर तर उजवीकडे कुलस्वामिनी आशापुरी मंदिर आहे. पायथ्याशी तापी-पांझरा संगमाचे निसर्गरम्य दृश्य, परिसरातील मोर, लांडोर व हरणांचा मुक्त संचार भाविकांना आकर्षित करतो. मुडावद व कपिलेश्वर तीरावर नौकाविहाराची सुविधा उपलब्ध असून खोल डोह असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते.

 

विकासासाठी निधी

 

मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने दोन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. उर्वरित सहा कोटी रुपयांसाठी पाठपुरावा सुरू आहे. भक्तनिवास, पाणीपुरवठा, शौचालय आदी सुविधांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून मंदिर संस्थानने जागा उपलब्ध करून दिली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ट्रान्सफॉर्मर व विद्युत पोल उभारून परिसरात रोषणाई करण्यात आली आहे.

 

वाहतूक व सुरक्षा व्यवस्था

 

यात्रोत्सव काळात अमळनेर आगारातून थेट कपिलेश्वर मंदिरापर्यंत बससेवा उपलब्ध राहणार आहे. शिंदखेडा व शिरपूर भागातूनही मुडावद व भोरटेकपर्यंत खाजगी वाहनांची सुविधा असेल. मंदिरापर्यंत पक्का डांबरी रस्ता उपलब्ध आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *