
अमळनेरमध्ये श्री गिरुवाजी पार्श्वनाथ जैन मंदिराचा आज ७५ व्या वर्धापनदिनानिमित्ताने मिरवणूक व धार्मिक कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) येथील सराफ बाजारातील श्री गिरुवाजी पार्श्वनाथ जैन मंदिराचा ७५ वा वर्धापनदिन आज, दि. १९ एप्रिल रोजी अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली असून, संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. विशेष म्हणजे, जैन बांधवांसह सर्व समाजातील नागरिकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे.
वर्धापन दिनानिमित्त आज रविवार, दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता मंदिरापासून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत श्री १०८ पार्श्वनाथ प्रभूंच्या प्रतिकृतीचे पावन दर्शन भक्तांना मिळणार आहे. तसेच मंदिराच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष ध्वजाने सजवलेला ट्रक, वर्षीदान रथ आणि विविध आकर्षक रथ सहभागी होणार आहेत. मिरवणुकीत ढोल-पथक व बॅन्ड पथकांच्या गजरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून, मुमुक्षु परम हार्दिक शाह यांच्या दीक्षा-सन्यास निमित्त विशेष वर्षीदान रथाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तपस्वीरत्न पूज्य मुनिश्री हितरक्षितविजयजी तसेच पूज्य मुनिश्री विनयरक्षित विजयजी यांचे पावन सान्निध्य लाभणार आहे.
सायंकाळी मंदिरात श्री पार्श्वनाथ प्रभूंची विविध अलंकारांनी सजवलेली आकर्षक अंगरचना करण्यात येणार असून, संपूर्ण मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई व सुवासिक फुलांची भव्य सजावट करण्यात येणार आहे. या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रभूंचे दर्शन व गुरूंच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गिरुवाजी पार्श्वनाथ जैन मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply