अमळनेरात मशाल मोर्चातून केंद्र-राज्य सरकारविरोधात पुकारला एल्गार

अमळनेर (प्रतिनिधी) क्रांती दिनानिमित्त रविवारी, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी अमळनेर शहरात विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने मशाल मोर्चा काढून केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार एल्गार करण्यात आला. तिरंगा चौकातून मशाली हातात घेऊन सुरू झालेला हा मोर्चा सुभाष चौक, पाचकंदील चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचला. यावेळी सरकारविरोधी घोषणांनी शहराचा परिसर दणाणून गेला.


मोर्चाची सुरुवात तिरंगा चौकातून झाली. मशाली हातात घेऊन सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांच्या घोषणा देत शहरातून मार्गक्रमण केले. सुभाष चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पाचकंदील चौकातील क्रांती स्मारकाला महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यानंतर मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचला. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेत महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, भ्रष्टाचार, शेतकरी-कष्टकरी व विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिलांवरील अन्याय, पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.अमळनेर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, शहर व ग्रामीण भागातील नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, तसेच पूरग्रस्त भागात स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. शेतमालाला हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, पाडळसरे धरणासाठी दरवर्षी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा आणि पीक विमा योजनेतील पीक कापणी प्रयोगाचा निकष रद्द करावा, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. तसेच ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावेळी प्रशांत निकम, गोकुळ बोरसे, सुरेश पिरन पाटील, योजना पाटील, अधिवक्ता तिलोत्तमा पाटील, प्रताप आबा पाटील, गजेंद्र साळुंखे, जाकीर शेख, नरेंद्र पाटील, लोटन अण्णा चौधरी, अरुण देशमुख, पंढरीनाथ बागुल, अधिवक्ता कौस्तुभ पाटील, मकसूद पठाण, प्रा. लिलाधर पाटील, चिंधू वानखेडे, योगेश पाटील, गौतम मोरे, बाळासाहेब पाटील, नितीन निळे, अधिवक्ता रज्जाक शेख, विजय मास्तर पाटील, वासू मामा पाटील, गोकुळ आबा पाटील, अधिवक्ता गिरीश पाटील, राकेश पवार, सुनील पाटील, संतोष पाटील आणि प्रवीण पवार आदी उपस्थित होते. क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर निघालेल्या या मशाल मोर्चातून स्थानिक प्रश्नांसह शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला आणि लोकशाहीशी संबंधित विविध मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात आले. मशालींच्या प्रकाशात झालेल्या या आंदोलनातून सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एम. पाटील यांनी केले, तर श्याम पाटील यांनी आभार मानले.

 

विविध मान्यवरांची सरकारच्या धोरणांवर टीका

 

सभेचे प्रास्ताविक बी. के. सूर्यवंशी यांनी केले. अधिवक्ता शकील काझी, चंद्रशेखर भावसार, रियाज मौलाना, बन्सीलाल भागवत, प्रा. अशोक पवार, शिवराम पाटील, सुलोचना वाघ आणि डॉ. बी. एस. पाटील यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी, विद्यार्थी, महिला, पिण्याचे पाणी, पाडळसरे धरण तसेच लोकशाहीच्या प्रश्नांवर मनोगत व्यक्त केले.

 

विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग

 

या मशाल मोर्चात महाविकास आघाडीसह मराठा सेवा संघ, मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशन, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, एनएसयूआय, निवृत्त सेवा संघटना, पुरोगामी क्रांती दल, प्रहार संघटना आणि साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *