प्रतापच्या सेवानिवृत्त ज्युनिअर आणि सिनिअर प्राध्यापकांचा स्नेहमेळावा उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप महाविद्यालयातील ज्युनिअर व सिनिअर महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक बंधू-भगिनींच्या स्नेहभावाला नवी उभारी देणारा आणि जुन्या सुवर्ण आठवणींना उजाळा देणारा स्नेहमेळावा रविवार, ९ ऑगस्ट रोजी प्रताप तत्त्वज्ञान केंद्र, अमळनेर येथे आनंदी, उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

अनेक वर्षांनंतर महाविद्यालयातील माजी प्राध्यापक बंधू-भगिनी एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एकमेकांची आस्थेने विचारपूस, जुन्या सहकाऱ्यांच्या आठवणी, हास्य-विनोद आणि एकत्रित भोजनामुळे संपूर्ण वातावरणात आपुलकीची आणि स्नेहाची उब निर्माण झाली. सहभागी प्राध्यापकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्नेहमेळाव्याला विशेष रंगत आली. या स्नेहमेळाव्याचे आयोजन अध्यक्ष प्रा. डॉ. पी. जे. जोशी, सचिव प्रा. डॉ. दिलीप भावसार आणि खजिनदार प्रा. डॉ. जयेश गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यकारी सदस्य प्रा. ए. एम. जैन, प्रा. एस. के. सोमाणी, प्रा. एम. एस. बडगुजर, प्रा. मनोहरजी सूर्यवंशी, प्रा. सुधीर पाटील, प्रा. सतीश सोनार आणि प्रा. ई. टी. चौधरी यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.

प्रतापशेठजींना अभिवादन करून स्नेहमेळाव्याला प्रारंभ

सकाळी ९ ते १० या वेळेत चहा, नाश्ता व नावनोंदणी झाली. त्यानंतर प्रताप महाविद्यालयातील पूज्य प्रतापशेठजी यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीने प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात आगमन झाल्यानंतर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.

 

वैचारिक प्रबोधनातून विचारांची उजळणी

 

पहिल्या सत्राचे अध्यक्षस्थान अण्णासाहेब प्रा. एस. ए. पाटील यांनी भूषविले. प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. या सत्रात प्रा. एस. के. सोमाणी, प्रा. डॉ. प्र. ज. जोशी आदी मान्यवरांनी विचार मांडले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिलीप भावसार यांनी केले, तर आभार प्रा. प्रकाश अग्रवाल यांनी मानले. प्रा. डॉ. मनीष करंजे, मानद संचालक, यांचीही उपस्थिती होती.

 

‘सोनेरी आठवणीं’नी डोळ्यांत दाटले भाव

 

दुसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थान प्रा. पी. टी. धर्माधिकारी यांनी भूषविले. प्रा. एस. आर. पाटील आणि प्रा. सुधीर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी इच्छुक प्राध्यापकांनी महाविद्यालयीन जीवनातील सोनेरी आठवणी, अनुभव आणि सहकाऱ्यांसोबतच्या अविस्मरणीय क्षणांचे कथन केले. जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि वातावरण भावुक झाले. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. जयेश गुजराथी यांनी केले, तर आभार सतीश सोनार यांनी मानले.

 

स्नेहभोजनाने वाढली आपुलकीची गोडी

 

दुपारी १.३० ते २.३० या वेळेत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. एकादशीचा उपवास करणाऱ्या प्राध्यापक बंधू-भगिनींसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आल्याने त्याचे कौतुक करण्यात आले. भोजनाच्या नियोजनासाठी सहभागी प्राध्यापक बंधू-भगिनींनी सहकार्य केले. या स्नेहमेळाव्यामुळे प्रताप महाविद्यालयाशी जोडलेल्या जुन्या सहकाऱ्यांचे ऋणानुबंध पुन्हा दृढ झाले. सेवाकाळातील सहवास, विद्यार्थ्यांशी जोडलेले भावबंध आणि महाविद्यालयाच्या आठवणी यांना उजाळा मिळाल्याने उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *