
महाराणा प्रताप चौक ते तिरंगा चौक डिव्हायडरवरील संरक्षक जाळी मोडकळीस
तुटलेल्या ग्रीलमुळे अपघाताचा धोका वाढला; तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील धुळे–चोपडा मुख्य मार्गावरील महाराणा प्रताप चौक ते तिरंगा चौक दरम्यान डिव्हायडरवर बसविण्यात आलेली लोखंडी संरक्षक जाळी सध्या मोडकळीस आली असून अनेक ठिकाणी ती तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. काही ठिकाणी जाळी पूर्णपणे उखडली गेली असून तर काही ठिकाणी लोखंडी कड्या बाहेरच्या दिशेने झुकल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन तत्कालीन आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या प्रयत्नांतून धुळे–चोपडा मार्गावर डिव्हायडरसह मजबूत लोखंडी ग्रील बसविण्यात आले होते. या उपाययोजनेमुळे वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत झाली होती. मात्र कालांतराने या ग्रीलची दुरवस्था झाल्याने संपूर्ण व्यवस्थेचाच उद्देश धोक्यात आल्याचे चित्र आहे. सदर रस्ता हॅम योजनेअंतर्गत धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली असून देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर आहे. मात्र अनेक महिन्यांपासून जाळी तुटलेल्या अवस्थेत असतानाही दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे, श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर गणेशोत्सव २०२५ दरम्यान एका आयशर वाहनाने डिव्हायडरला जोरदार धडक दिल्यामुळे ग्रीलसह लोखंडी जाळीचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेनंतरही दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. तसेच बसस्थानक परिसरातील अनेक ठिकाणीही जाळी तुटलेली असून काही भाग धोकादायक अवस्थेत असल्याचे दिसून येते. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या प्रमाणात वाहने प्रवास करतात. तुटलेल्या जाळीमुळे अनेक नागरिक डिव्हायडरमधूनच रस्ता ओलांडत असल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे.
एकीकडे शहर सुशोभीकरणाच्या विविध योजना राबविल्या जात असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे शहराच्या प्रमुख मार्गावरील सुरक्षाव्यवस्थेची झालेली दुर्दशा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे
“डिव्हायडरवरील तुटलेल्या जाळीमुळे नागरिक थेट रस्ता ओलांडतात. त्यामुळे अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. संबंधित विभागाने केवळ पाहणी न करता तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply