
अमळनेरमध्ये कापड दुकानास लागली आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील व्यापारी संजय मंगलचंद कोठारी यांच्या कापड दुकानासह वरच्या निवासी भागात सोमवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. दुकानाच्या खाली मोठ्या प्रमाणात कापडाचा साठा असल्यामुळे आग वेगाने पसरून मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अग्निशमन दलाच्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, व्यापारी संजय मंगलचंद कोठारी यांच्या कापड दुकानासह वरच्या निवासी भागात आग लागली. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक गोपी कासार व सुरज परदेशी यांनी त्वरित अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत वेगाने परिस्थिती नियंत्रणात आणली. आग आटोक्यात आणण्यासाठी अत्यंत जलद आणि समन्वयाने काम करण्यात आले. या प्रसंगी स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात मदत करत अग्निशमन दलाला सहकार्य केले. नागरिकांच्या तत्परतेमुळे आग अधिक पसरू न देता नियंत्रणात आणणे शक्य झाले. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जफर पठाण, मच्छिंद्र चौधरी, आकाश संदानशिव, लखन कंखरे व भिका संदानशिव यांनी धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply