
अमळनेर यात्रेतील ठेका पद्धतीला तीव्र विरोध; आंदोलनाचा इशारा
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषदेमार्फत दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या पारंपरिक यात्रेमध्ये यावर्षी ठेका पद्धती लागू करण्याच्या निर्णयाला स्थानिक दुकानदार, पाळणेधारक व नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे नगरपरिषदेमार्फत थेट पावती देऊन शुल्क वसुली केली जात होती. ही पद्धत पारदर्शक व स्थानिक व्यावसायिकांच्या हिताची असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. मात्र यावर्षी ठेका पद्धतीने वसुली करण्याचा निर्णय घेतल्याने दुकानदारांवर अवाजवी आर्थिक भार पडण्याची शक्यता असून, शोषण व भ्रष्टाचाराला वाव मिळू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, मीना बाजार विखुरल्यास महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या पारंपरिक जागांवरच व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
आंदोलकांनी नगरपरिषदेसमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या असून, त्यामध्ये ठेका पद्धती रद्द करून जुनी पद्धत कायम ठेवणे, मीना बाजार एकाच ठिकाणी ठेवणे व जुन्या पाळणेधारकांना त्यांच्या पारंपरिक जागांवर व्यवसाय करण्यास परवानगी देणे यांचा समावेश आहे.
या मागण्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन, धरणे व मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदा व सुव्यवस्था परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी देवा लांडगे (भाजप शहर सरचिटणीस),मा. अध्यक्ष विजय राजपूत, सरचिटणीस देवा लांडगे,दिलीप ठाकूर, सुभाष पाटील, राहुल चौधरी, रमेश देव, रामभैया कलोसे,महेश संदांशिव,रवी ठाकूर,विजय विठ्ठल पाटील, मनोहर महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply