साखरपुड्याच्या मेकअपसाठी आलेली तरुणी पार्लरमधून झाली बेपत्ता

अमळनेर (प्रतिनिधी) साखरपुड्याच्या तयारीसाठी मेकअप करण्याकरिता अमळनेर शहरातील ब्युटी पार्लरमध्ये आलेली २१ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना २८ रोजी घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका खेडेगावातील २१ वर्षीय तरुणीचा १ जून रोजी साखरपुडा असल्याने ती २८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास चुलत भावासोबत अमळनेर शहरातील सुरभी कॉलनी परिसरातील स्वामीनी ब्युटी पार्लरमध्ये मेकअपसाठी आली होती. मेकअपसाठी चार ते पाच तास लागणार असल्याने तसेच गावात लग्नकार्य असल्यामुळे तिचा चुलत भाऊ तिला पार्लरमध्ये सोडून निघून गेला. दरम्यान, सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास चुलत भाऊ तिला घेण्यासाठी पार्लरमध्ये गेला असता ती तेथे आढळून आली नाही. तिचा मोबाईल फोनही बंद लागत असल्याने नातेवाईकांनी परिसरात तसेच ओळखीच्या ठिकाणी शोध घेतला. मात्र, कोणताही तपास लागला नाही. अखेर तरुणीच्या भावाने अमळनेर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नितीन मनोरे करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *