
अमळनेरात अखिल महाराष्ट्र मुस्लीम खाटीक समाजातील २० जोडप्यांचा ५ रोजी पहिला सामूहिक विवाह सोहळा
अमळनेर (प्रतिनिधी) येथील अखिल महाराष्ट्र मुस्लीम खाटीक समाजातर्फे ५ फेब्रुवारीलाप हिल्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात २० जोडप्यांचे शुभ मंगल होणार आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना आधार देण्याच्या उद्देशाने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा विवाह सोहळा बुधवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अमळनेर येथे पार पडणार आहे. या ऐतिहासिक सामूहिक विवाह सोहळ्यासाठी राज्यातील मान्यवर लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, खाटीक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय डॉ. माजी आमदार फारुक शाह, नगराध्यक्ष परिक्षित बाविस्कर, जळगांव चे एजाज मलिक, करीम सालार, फारुक शेख, तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभेच्छा व आशीर्वाद देणार आहेत. हा सामूहिक विवाह सोहळा समाजातील ऐक्य, सलोखा व सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रतीक ठरणार असून, विवाहाचा वाढता खर्च कमी करून समाजातील तरुण-तरुणींना सन्मानाने विवाह करण्याची संधी देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमास सहकार्य केल्याबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल महाराष्ट्र मुस्लीम खाटीक समाज पंच कमिटी, अमळनेर व इज्तेमाई शादी कमिटी परिश्रम घेत असून, नगरसेवक मुख्तार खाटीक (अध्यक्ष), यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य सक्रिय सहभाग घेत आहेत. या सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply