पात्रता नसलेल्यांना घरकुलाचा लाभ नाही; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे सीईओ करिष्मा नायर यांचे निर्देश

अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी प्रधानमंत्री आवास योजना व राज्यपुरस्कृत घरकुल योजनांतील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देत, पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत घरकुलाचा लाभ दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा ग्रामसेवकांना दिला.

अमळनेर येथे मंगळवारी इंदिरा भवन येथे ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवकांची आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (टप्पा १ व २), रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, मोदी आवास योजना, करवसुली, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), स्वच्छ भारत अभियान, वृक्षलागवड तसेच अंगणवाडी सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच ग्रामपंचायतींची फेरआकारणी करण्याबाबत आणि स्वच्छ भारत मिशन अभियान २०२६ अंतर्गत प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

घरकुल लाभार्थी निवड प्रक्रियेत शासनाने निश्चित केलेले पात्रता व अपात्रता निकष काटेकोरपणे लागू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. ग्रामसभेमार्फत लाभार्थी यादीचे पुनरावलोकन करून प्रत्यक्ष पडताळणीच्या आधारे प्राधान्यक्रम निश्चित करण्यास सांगण्यात आले. पक्के घर असलेले, शासकीय नोकरीतील, आयकर भरणारे, ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक जमीनधारक किंवा जास्त उत्पन्न असलेले नागरिक घरकुल योजनेस अपात्र ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तर प्रथमच लाभ घेणारे, दिव्यांग, महिला प्रमुख कुटुंब, निराधार, आदिम जमाती तसेच गंभीर आजारग्रस्त सदस्य असलेल्या कुटुंबांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय १५ वा वित्त आयोग निधी, ग्रामपंचायत घरपट्टी व पाणीपट्टी करवसुली, लेखापरीक्षण, मनरेगा, ई-ऑफिस, महा-आयटी, ग्रामपंचायतीचे दप्तर ऑनलाइन करणे, अंगणवाडी वीज व गॅस जोडणी, स्वच्छ भारत अभियान आणि वृक्षलागवड नियोजन या विषयांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. आरोग्य केंद्रातील काही बाबींवर त्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीस प्रकल्प संचालक राजू लोखंडे, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी गिरीष गोसावी, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील, गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, विस्तार अधिकारी दिनेश साळुंखे, विकास ईदे, शाखा अभियंता दिनेश कोते, दीपक बोरसे तसेच ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात बैठक झाली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *