अमळनेरात दोन ठिकाणी लागल्या आगी; अग्निशमन दलाची तत्परता, मोठा अनर्थ टळला

  • अमळनेर (प्रतिनिधी)  शहरात दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास वेगवेगळ्या दोन ठिकाणी अचानक आग लागल्याच्या घटना घडल्या. रेल्वे बोगद्याच्या अलीकडे तसेच विप्रो कंपनीच्या बाजूला या आगी लागल्या. या दोन्ही ठिकाणची आग अग्निशमन दलाच्या बंबांनी वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंना असलेल्या मोकळ्या जागांमध्ये तसेच शहरातील रिक्त भूखंडांवर मोठ्या प्रमाणात काटेरी बाभळीची झाडे वाढलेली आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही काटेरी झाडे काढण्यात आली होती. मात्र काढलेली झाडे तेथेच कोरडी पडून असल्याने आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता. अज्ञात व्यक्तीने कचरा जाळला असावा किंवा बिडी-सिगारेट ओढणाऱ्यांनी पेटती काडी फेकल्याने दोन्ही ठिकाणी जवळपास एकाचवेळी आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तातडीने अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांना दोन अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवण्याच्या सूचना दिल्या. विप्रो कंपनीच्या बाजूला लागलेली आग वाढत असल्याने तेथील अधिकाऱ्यांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कंपनीकडूनही एका बाजूने पाण्याचा मारा सुरू करण्यात आला. दरम्यान, अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश गोसावी, फारूख शेख, दिनेश बिऱ्हाडे, सत्येन संदानशिव, वसीम पठाण, मच्छीन्द्र चौधरी, भिका संदानशिव, आनन्दा झिम्बल, आकाश संदानशिव, आकाश बाविस्कर यांनी तत्परतेने प्रयत्न करून दोन्ही ठिकाणची आग पूर्णपणे विझवली.उन्हाळ्याच्या दिवसांत कोरड्या गवतामुळे आग लागण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी कचरा जाळू नये तसेच पेटत्या वस्तू मोकळ्या जागेत फेकू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *