खासदार संजय दीना पाटील यांचा अमळनेरात निषेध; पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) खासदार संजय दीना पाटील यांनी माध्यम प्रतिनिधी व पत्रकारांशी अरेरावीची भाषा वापरत अवमानकारक तसेच मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप करत अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमळनेर पोलीस ठाण्यामार्फत निवेदन देण्यात आले.

हे निवेदन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी स्वीकारले. निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, पोलीस अधीक्षक, जळगाव तसेच जिल्हाधिकारी, जळगाव यांनाही देण्यात आल्या. निवेदनात म्हटले आहे की, खासदार संजय दीना पाटील यांनी माध्यम प्रतिनिधी व पत्रकारांशी अवमानकारक तसेच धमकीची भाषा वापरल्याने पत्रकारांच्या भावना दुखावल्या असून पत्रकारितेच्या सन्मानाला धक्का पोहोचला आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याचे आणि लोकहिताचे प्रश्न उजेडात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो. त्यामुळे पत्रकारांचा अवमान करणे म्हणजे भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर आघात करण्यासारखे असल्याचे संघाने नमूद केले आहे.

तसेच, खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांची जाहीर व बिनशर्त माफी मागावी, पत्रकारांविषयी करण्यात आलेल्या अवमानकारक व धमकीजनक वक्तव्याची योग्य ती दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी आणि भविष्यात पत्रकारांच्या सन्मानाला धक्का पोहोचेल असे कोणतेही वक्तव्य किंवा कृत्य होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास पत्रकारांच्या स्वाभिमान व सन्मानाच्या रक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार राखून ठेवत असल्याचेही संघाने स्पष्ट केले आहे. निवेदन देताना अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, जेष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील, संजय पाटील, खबरीलालचे संपादक जितेंद्र ठाकूर, महेंद्र पाटील, बाबूलाल पाटील, हिरालाल पाटील, डॉ.विलास पाटील, संभाजी देवरे, संदीप सोनवणे, डॉ. युवराज पाटील, विजय पाटील, महेंद्र रामोशे, विक्की जाधव, कुंदन खैरनार, मुन्ना शेख, रविंद्र मोरे, काशिनाथ चौधरी यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *