रमजान ईदपूर्वी अमळनेर बाजारपेठेत खरेदीची लगबग; कपडे व सुकामेव्याला मोठी मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) अवघ्या एका दिवसांवर रमजान ईद येऊन ठेपल्याने शहरातील बाजारपेठेत खरेदीची जोरदार लगबग सुरू झाली आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर कपड्यांची दुकाने, सुकामेवा विक्रेते तसेच विविध वस्तूंच्या दुकानांमध्ये मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे.

गेल्या दोन दिवसांपासूनच बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली असून, विशेषतः कपडे, टोप्या, सुट, सौंदर्यप्रसाधने, अत्तरे, मुला-मुलींचे नवे कपडे, बंगड्या यांसह पठाणी ड्रेसला मोठी मागणी आहे. याशिवाय ईदच्या दिवशी बनविण्यात येणाऱ्या पारंपरिक शिरखुर्म्यासाठी सुकामेवा, रंगीत शेवया, खजूर आणि विविध खाद्यपदार्थांच्या खरेदीतही मोठी वाढ झाली आहे. मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये सणाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. नमाज अदा करण्यासाठीही जोरदार तयारी सुरू आहे. ईदच्या दिवशी सकाळी इदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण करून देशात शांतता व सलोखा नांदो, अशी प्रार्थना करणार आहेत.

रमजान महिन्यात दानधर्माला विशेष महत्त्व दिले जाते. उत्पन्नातील अडीच टक्के रक्कम ‘जकात’ म्हणून गरजूंपर्यंत पोहोचवली जाते. तसेच गरिबांना कपडे, अन्नधान्य वाटप केले जाते. या दानधर्मामध्ये गुप्तता पाळण्याची परंपरा असल्याचेही जाणकारांनी सांगितले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *