
स्वातंत्र्यदिनीच उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयावर तिरंगा फडकलाच नाही?
शासकीय कार्यालयाच्या निष्काळजीपणावर संताप; भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराची चौकशीची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) : देशभरात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना अमळनेर येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला नसल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. राष्ट्रीय सणाच्या दिवशी शासकीय कार्यालयावर तिरंगा फडकला नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्याने संताप व्यक्त केला जात असून, या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
भूमी अभिलेख विभाग हा नागरिकांच्या जमिनीशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा शासकीय विभाग मानला जातो. मोजणी, हद्द निश्चिती, नकाशे, अभिलेखातील नोंदी, मालमत्ता विषयक विविध कामांसाठी नागरिकांना या कार्यालयाचा सातत्याने संपर्क ठेवावा लागतो. अशा महत्त्वाच्या कार्यालयातच स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण झाले नसल्याचे चित्र समोर येत असेल, तर हा केवळ प्रशासकीय हलगर्जीपणाचा विषय नसून राष्ट्रीय सन्मानाशी संबंधित गंभीर प्रश्न असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनुसार, जर कार्यालयात ध्वजारोहण झाले नसेल तर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी १५ ऑगस्ट रोजी नेमके कुठे होते? त्यांनी झेंडावंदन कोणत्या ठिकाणी केले? त्या कार्यक्रमाची नोंद आहे का? राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत. यासोबतच त्या दिवसाची उपस्थिती नोंद, कार्यालयीन डायरी, ध्वजारोहणाबाबतचे आदेश, नियोजन व जबाबदाऱ्या यांची तपासणी करण्याची मागणी होत आहे. ध्वजारोहणाची जबाबदारी नेमकी कोणाकडे सोपविण्यात आली होती? आवश्यक तयारी झाली होती का? आणि जर ध्वजारोहण झाले नसेल तर त्यासाठी जबाबदार कोण? याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी नियुक्तीच्या मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याची चर्चा देखील शहरात सुरू आहे. या चर्चेत तथ्य आहे की नाही, याचीही प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी पुढे येत आहे. अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसतील तर त्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांवर होत आहे का, याचाही तपास होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट हा केवळ शासकीय सुट्टीचा दिवस नसून देशाच्या स्वातंत्र्याचा गौरवशाली दिवस आहे. लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ प्रत्येक शासकीय कार्यालयात राष्ट्रध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना देणे अपेक्षित असते. त्यामुळे शासकीय कार्यालयातच ध्वजारोहणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणे ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. या प्रकरणात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चौकशीत कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणा किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी पुढे येत आहे. दरम्यान, सलग दोन दिवस शासकीय सुट्टी असल्याने उपअधीक्षक भूमी अभिलेख एस. पी. गावित यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संपर्क होऊ न शकल्याने या प्रकरणाबाबत त्यांची अधिकृत भूमिका समोर येऊ शकलेली नाही. राष्ट्रध्वज हा देशाच्या स्वातंत्र्याचा, सार्वभौमत्वाचा आणि स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा सर्वोच्च प्रतीक मानला जातो. त्यामुळे उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात ध्वजारोहण झाले की नाही, झाले नसेल तर त्यामागील कारणे काय, संबंधित अधिकारी व कर्मचारी त्या दिवशी कुठे होते आणि जबाबदारी निश्चित कोणाची आहे, याचा उलगडा प्रशासनाने तातडीने करावा, अशी जोरदार मागणी आता अमळनेरकर नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply