
अमळनेरमध्ये वेगवेगळ्या भागांतून दोन तरुणींसह तरुणाचे झाले अपहरण
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शिरूड नाका, कचेरीच्या मागील भागात आणि पैलाड येथील साई गजानन नगर परिसरातून दोन तरुणी व एका तरुणाचे अपहरण झाल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. या तिन्ही प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम १४०(३) अन्वये अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरूड नाका भागातील १८ वर्षीय तरुणी २८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान प्रताप महाविद्यालयात गेली होती. यावेळी शिरूड नाका येथील ओंकार नगरमधील रोहित क्रितेश सोनवणे याने तिला काहीतरी फूस लावून प्रताप महाविद्यालयातून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने दिली आहे. या फिर्यादीवरून रोहित क्रितेश सोनवणे याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत कचेरीच्या मागील भागातील २१ वर्षीय तरुणीला २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान तिच्या राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी तरुणीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत पैलाड भागातील साई गजानन नगर येथील कनराज रमेश पारधी (वय ३५) याला २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याच्या राहत्या घरातून कोणीतरी गुप्तपणे व गैरपणे परिरुद्ध करण्याच्या उद्देशाने अपहरण करून नेल्याची फिर्याद त्याचा भाऊ योगीराज पारधी यांनी दिली. या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास उदय बोरसे करीत आहेत.

Leave a Reply