
धनगर समाज कर्मचारी संघटनेच्या बैठकीत संघटनात्मक बांधणीवर दिला भर
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा धनगर समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित बैठकीत कर्मचारी एकीकरण, संघटनात्मक बांधणी, सदस्य नोंदणी, कर्मचारी गणना अभियान आणि समाजाच्या आगामी वाटचालीच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीचे अध्यक्षस्थान माजी केंद्रप्रमुख बन्सीलाल भागवत यांनी भूषविले. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववानांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. अहिल्यादेवींच्या कार्यातून समाजसेवा, न्याय, धैर्य आणि लोककल्याणाची प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यामध्ये जिल्हाध्यक्ष तुळशीराम सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा भारतीताई ठाकरे, जिल्हा सरचिटणीस अनिल मनोरे आणि कार्याध्यक्ष पांडुरंग पवार यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. बी. धनगर यांनी केले, तर आभार उमेश मनोरे यांनी मानले. बैठकीस धनगर समाजातील कर्मचारी, पदाधिकारी तसेच विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्मचारी गणना अभियान व सदस्य नोंदणीवर भर
प्रास्ताविकात गोपाल हडपे यांनी धनगर समाजातील शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत कर्मचारी बांधवांची माहिती संकलित करण्यासाठी कर्मचारी गणना विशेष अभियान राबविण्याची गरज व्यक्त केली. तसेच तालुकानिहाय कर्मचारी संपर्क, सदस्य नोंदणी आणि संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
कर्तृत्ववानांचा गौरव
बैठकीदरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून समाजाचा गौरव वाढविणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये वसुंधराताई लांडगे यांची अमळनेर अर्बन बँकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती, डी. ए. धनगर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, सुवर्णाताई धनगर यांना ए.एन.एम. प्रमोशनल एल.एच.व्ही. पॅरामेडिकल मुंबई परीक्षेत जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक, प्रमोद बाविस्कर यांची सहाय्यक आगार व्यवस्थापकपदी नियुक्ती आणि बापूराव सांगोरे यांना क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त सोनालीताई धनगर व भारतीताई धनगर यांनी एस.टी. महामंडळ अमळनेर येथे ३०० उकडीच्या मोदकांचे वाटप केल्याबद्दल, अनिलदादा बागुल यांनी कुस्तीमध्ये पदक पटकावल्याबद्दल आणि निलेशदादा लांडगे, आदर्श व्यक्तिमत्व तथा संस्थाचालक, न्यू व्हिजन स्कूल इंग्लिश मीडियम अमळनेर, यांचाही सत्कार करण्यात आला.
एकत्र आलो तर प्रश्नांना दिशा मिळेल
जिल्हाध्यक्ष तुळशीराम सोनवणे यांनी मनोगतात संघटनेच्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. “आपण एकत्र आलो, तर प्रश्नांना दिशा मिळेल; आपण संघटित झालो, तर समाजाला नवी शक्ती मिळेल,” असा संघटनात्मक संदेश त्यांनी दिला. नूतन कार्यकारणी सर्वांना सोबत घेऊन, ज्येष्ठांचे मार्गदर्शन स्वीकारून आणि संघटनेच्या उद्दिष्टांना केंद्रस्थानी ठेवून काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पद हे केवळ जबाबदारीचे प्रतीक असून संघटित विचार, परस्पर सहकार्य आणि समाजहिताची भावना हीच संघटनेची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. तालुकानिहाय कर्मचारी संपर्क, सदस्य नोंदणी, कर्मचारी गणना अभियान, प्रश्नांचे संकलन आणि आगामी कार्यक्रमांचे नियोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मान्यवरांची मनोगते
वसुंधराताई लांडगे, डी. ए. धनगर, प्रा. विजय शिरसाट, श्रावण तेले, भारतीताई ठाकरे, अनिल मनोरे आणि उमेश मनोरे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात बन्सीलाल भागवत यांनी संघटना बांधणीसाठी मार्गदर्शन केले. प्रत्येकाने संघटनेसाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि समाजहिताची भावना जपावी, असे त्यांनी आवाहन केले.
नूतन पदाधिकाऱ्यांची जबाबदारी जाहीर
धनगर समाज कर्मचारी संघटना जळगावच्या विविध पदांवर गोपाल हडपे – जिल्हा उपाध्यक्ष, आनंदा धनगर – जिल्हा संघटक आणि निरंजन पेंढारे – जिल्हा कोषाध्यक्ष यांची जबाबदारी देण्यात आली. धनगर समाज कर्मचारी संघटना जळगाव प्रणित अमळनेर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनिल बागुल – तालुका अध्यक्ष, भूषण आत्माराम इधे – तालुका उपाध्यक्ष, दिलीप नामदेव खांडेकर – कोषाध्यक्ष, बापूराव संगोरे – सहकोषाध्यक्ष, राकेश पवार – कार्याध्यक्ष, मनोज मोर – प्रसिद्धी प्रमुख, धनगर समाजाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते चेतन देवरे – सचिव, मयूर धनगर – सहसचिव, प्रीतम रत्नपारखी – संघटक, प्रमोद बाविस्कर, गोपाल धनगर, खेमचंद साबे, मनोज रत्नपारखी व सोपान मोर – सहसंघटक यांची जबाबदारी देण्यात आली. महिला कर्मचारी संघटनेच्या अमळनेर पदाधिकाऱ्यांमध्ये सुमित्रा मनोज रत्नपारखी – तालुका अध्यक्षा, शीतल उमेश मनोरे – उपाध्यक्षा, कविता शशिकांत आढावे – सचिव, सोनाली राजेंद्र धनगर – सहसचिव, भारती गोपाल धनगर, वैशाली देवीदास धनगर व कविता ठाकरे – सदस्या यांची नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply