नियमाप्रमाणे असणाऱ्या कामांचीच बिले दिली जातील : माजी आमदार शिरीष चौधरी यांचा खुलासा

अमळनेर (प्रतिनिधी) नगरपरिषदेच्या विविध विकासकामांच्या बिलांवरून आमदार अनिल पाटील यांनी केलेल्या आरोपांनंतर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत आमदारांच्या आरोपांना  प्रत्युत्तर देत आरोपांचा खुलासा केला. आमदार अनिल पाटील यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे असल्याचे सांगत जी कामे नियमाप्रमाणे आहेत त्यांनाच बिले दिली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत स्मशानभूमीच्या कामाबाबत बोलताना चौधरी म्हणाले की, स्मशानभूमीचे शेड मंजूर करण्यात आले असले तरी प्रेत दहन करण्यासाठी लागणारा ओटा (बेड) मंजूर केलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात प्रेत खालीच जाळावे लागणार आहे. या कामाबाबत थर्ड पार्टी ऑडिट करून कामाचा दर्जा तपासल्यानंतरच बिल अदा केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेचे काम बंद पडले असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. उलट माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांच्या वॉर्डात सध्या काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा योजनेचा ठेकेदार काम बंद करून अमळनेरच्या जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोप करत अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. आम्ही स्वतःच्या खर्चाने अनेक कामे मार्गी लावली असल्याचे सांगताना चौधरी यांनी आमदार अनिल पाटील यांच्यावर टीका केली.

डीपी रस्त्याच्या कामावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या कामात रस्त्याची रुंदी व जाडी अंदाजपत्रकाप्रमाणे नसल्याचेही त्यांनी सांगितले. अंदाजपत्रकात एम -40 दर्जाचे काम देण्यात आले असताना प्रत्यक्षात एम -20 दर्जाचे काम करण्यात आले असल्याचा आरोप करत सिमेंट, वाळू व खडीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला.

आमदारांना जनतेच्या विकासाचे काही देणेघेणे नाही, असा आरोपही चौधरी यांनी केला. गेल्या सात वर्षांत त्यांनी एकही आमसभा घेतली नाही. कारण त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

वाळूच्या ठेक्यांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. वाळूचे ठेकेदार कोण आहेत आणि त्यांना कोणाच्या नातेवाईकांना टेंडर दिले जातात, याचा तपास व्हायला हवा, असे ते म्हणाले. स्वतःच्या स्वार्थासाठी पालिकेला कर्जबाजारी करण्यात आले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अंत्यसंस्कारासाठी गोवरी देण्याचा ठराव झाल्याचा मुद्दा उपस्थित करत चौधरी म्हणाले की, अद्याप या संदर्भात निविदा प्रक्रिया झालेली नाही. मग ५ हजार रुपयांचा दर कुठून आला, असा सवाल त्यांनी केला. तसेच गट नंबर ८३ मधून आमदारांनी किती गौण खनिज चोरी केली आहे, ते आम्ही बाहेर काढायचे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आम्ही बोगस बिले काढणार नाही. दोन महिन्यांत विकासकामे का आणली नाहीत, असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी स्वतः आणलेल्या कामांना किती वेळा मंजुरी मिळाली हे जनतेला सांगावे, असेही त्यांनी म्हटले. तसेच खरंच हिंमत असेल तर विधानसभेत अमळनेरच्या विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित करावा, असे खुले आव्हानही माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आमदार अनिल पाटील यांना दिले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *