दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा एन.मुक्टो.तर्फे काळ्या फिती लावून निषेध

अमळनेर (प्रतिनिधी) दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याचा महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघ (एन.मुक्टो.) अमळनेर स्थानिक शाखेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदविला.

यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी पूर्णवेळ काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेली पोलिस कारवाई ही लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचविणारी असून विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार अबाधित राहिला पाहिजे, अशी भूमिका एन.मुक्टो. स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ. भगवान भालेराव यांनी व्यक्त केली.

सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना समजून न घेता त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता हिंसात्मक कारवाई करणे ही अत्यंत निषेधार्ह बाब असल्याचे मत एन.मुक्टो.चे जिल्हा सचिव डॉ. लीलाधर पाटील यांनी व्यक्त केले. त्यानंतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांना निषेधाचे निवेदन सादर केले. या प्रसंगी एन.मुक्टो. स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ. भगवान भालेराव, सचिव डॉ. महादेव तोंडे, जिल्हा सचिव डॉ. लीलाधर पाटील, उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रमेश पावरा, डॉ. संगीता चंद्राकर, डॉ. प्रवीण पवार यांच्यासह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *