
नामभक्तीच्या गजरात राष्ट्रसंत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात साजरा
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर-शिंपी समाज मंडळ आणि भक्त निवास वाडी संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७६ वा संजीवन समाधी (पालखी) सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या सोहळ्याची सुरुवात सकाळी ९.०० वाजता पालखी मिरवणुकीने झाली. नामस्मरण आणि जयघोषाच्या गजरात निघालेल्या पालखी मिरवणुकीत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळी ११.०० वाजता पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. यानंतर नारदीय व्याख्याते ह.भ.प. प्रा. डॉ. प्रभाकर ज. जोशी यांनी राष्ट्रसंत नामदेव महाराज यांच्या जीवनकार्यावर आणि भक्तीपरंपरेवर मार्गदर्शनपर प्रवचन केले. नामदेव महाराजांच्या विचारांचा समाजजीवनावर झालेला प्रभाव आणि त्यांच्या अभंगवाङ्मयाचे महत्त्व यावर त्यांनी सविस्तर विवेचन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि नाविन्यपूर्ण माहितीने युक्त प्रवचनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी शिंपी समाज मंडळाचे सल्लागार विवेकानंद भांडारकर यांच्या हस्ते ह.भ.प. प्रा. डॉ. प्रभाकर ज. जोशी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर हार अर्पण व आरती करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला शिंपी समाज मंडळाचे अध्यक्ष भरत भिका शिंपी यांच्यासह कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी, महिला अध्यक्षा सुनेत्रा भांडारकर व त्यांचे कार्यकारी मंडळ, तरुण युवक मंडळाचे सदस्य तसेच समाजातील ज्येष्ठ स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मांडगे यांनी केले. भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा राष्ट्रसंत नामदेव महाराजांचा ६७६ वा पालखी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

Leave a Reply