आवास प्लसची यादी १५ ऑगस्टला ग्रामसभेत; पात्र-अपात्र लाभार्थ्यांची होणार छाननी

अमळनेर (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत आवास प्लस २०२४ मधील लाभार्थ्यांची कायम प्रतीक्षा यादी अंतिम करण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रामसभांमध्ये ड्राफ्ट कायम प्रतीक्षा यादी ग्रामस्थांसमोर सादर करून त्यातील लाभार्थ्यांची माहिती, कागदपत्रे आणि पात्रतेची सखोल पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे ड्राफ्ट यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांचे लक्ष आता ग्रामसभेकडे लागले आहे.

ग्रामसभेदरम्यान ड्राफ्ट यादीतील चुकीची नावे, अपात्र लाभार्थी अथवा आवश्यक बदलांबाबत चर्चा करून शिफारसी करण्यात येणार आहेत. ग्रामसभेच्या शिफारशीनुसार आवाससॉफ्ट प्रणालीमध्ये आवश्यक दुरुस्ती नोंदवून अंतिम कायम प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. ग्रामपंचायतींना ड्राफ्ट यादी सर्व नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामसभा सुरू होण्यापूर्वी ही यादी सार्वजनिकरित्या उपलब्ध असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ग्रामसभेची कार्यवाही, जिओ-टॅग छायाचित्रे आणि स्पष्ट समूह छायाचित्रे अपलोड करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ग्रामसभेने सुचविलेल्या बदलांनुसारच नोंदी करण्यात याव्यात तसेच अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे अपलोड करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आवास योजनेच्या निकषांनुसार पक्के छत किंवा पक्क्या भिंती असलेल्या घरात राहणारी तसेच दोनपेक्षा अधिक खोल्या असलेल्या घरातील कुटुंबे अपात्र ठरणार आहेत. याशिवाय मोटारचालित तीन किंवा चारचाकी वाहनधारक कुटुंबे, यांत्रिकीकृत कृषी उपकरणे असलेली कुटुंबे तसेच ४० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक पतमर्यादा असलेले किसान क्रेडिट कार्डधारक यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय कर्मचारी असल्यास, शासनाकडे नोंदणीकृत बिगरशेती उद्योग असल्यास, कुटुंबातील सदस्याचे मासिक उत्पन्न १९ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास, आयकर किंवा व्यावसायिक कर भरणारे कुटुंब तसेच निकषांमध्ये नमूद मर्यादेपेक्षा अधिक जमीन मालकी असलेली कुटुंबेही अपात्र ठरणार आहेत. अमळनेर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा एकमध्ये ६ हजार ३४१, टप्पा दोनमध्ये ३ हजार ५६६ घरकुले पूर्ण झाली असून टप्पा तीनमध्ये १० हजार ४२ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय मोदी आवास योजनेअंतर्गत २ हजार १४०, शबरी आवास योजनेअंतर्गत १ हजार ४५७ आणि रमाई आवास योजनेअंतर्गत १ हजार ३३८ घरकुले पूर्ण झाल्याची माहिती गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांनी दिली. ग्रामसभेत लाभार्थ्यांची पात्रता आणि कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ग्रामसभेच्या शिफारशीनुसार आवश्यक बदल आवाससॉफ्ट प्रणालीमध्ये नोंदविले जातील. त्यानंतर अंतिम कायम प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे ड्राफ्ट प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांनी ग्रामसभेत उपस्थित राहून आपल्या माहितीची आणि पात्रतेची खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *