
बिबट्याचा वन विभागाला १२ दिवसांपासून चकवा; एआयच्या अफवांनीही दहशत!
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका व शहरालगतच्या परिसरात गेल्या १२ दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने नागरिक, शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पारोळा वन विभागाने नऊ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक, पाच हायटेक ट्रॅप कॅमेरे आणि दोन पिंजरे तैनात केले असून पिंजऱ्यांमध्ये भक्षही ठेवण्यात आले आहे. संवेदनशील भागात रात्रंदिवस गस्त घालून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असले तरी तो वन विभागाच्या पथकाला सातत्याने चकवा देत असल्याने अद्याप जेरबंद झालेला नाही.
पारोळा वनपरिक्षेत्र अधिकारी छत्रपती चव्हाण यांच्या देखरेखीखाली वनपाल गुलाब पिंजारी, वनरक्षक मनीषा मोरे, वनरक्षक दुर्गादास वानखेडे, वनरक्षक योगेश पाटील तसेच कर्मचारी प्रविण पाटील, मयुर पाटील, समाधान पाटील, प्रकाश पाटील आणि पुंजू निकम यांचे पथक बिबट्याचा शोध घेत आहे. दरम्यान, प्रत्यक्ष बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये चिंता असतानाच सोशल मीडियावर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून शहर व परिसरातील विविध भागांत बिबट्या दिसल्याचे भासविणारे बनावट फोटो, व्हिडिओ आणि संदेश व्हायरल होत असल्याने अफवांनाही उधाण आले आहे. वास्तवदर्शी वाटणारे फोटो-व्हिडिओ कोणतीही खातरजमा न करता पुढे पाठविले जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती अधिक वाढत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बिबट्याचा वावर आणि सोशल मीडियावरील ‘बनावट बिबट्या’ यामुळे नागरिकांसमोर दुहेरी आव्हान निर्माण झाले आहे. जाणीवपूर्वक अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेऊन पोलीस प्रशासनाने कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या वतीने गावात नागरिक आणि शेतमजुरांसाठी जनजागृती कार्यशाळाही घेण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतात शक्यतो एकट्याने न जाता समूहाने काम करावे, लहान मुलांना एकट्याने शेतात नेऊ नये आणि बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, पाठलाग करणे अथवा त्याला घेरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले. केळी, ऊस यांसारख्या दाट पिकांमध्ये बिबट्याला लपण्यासाठी आसरा मिळू शकतो. त्यामुळे अशा शेतांमध्ये काम करताना विशेष खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात आले. बिबट्याची हालचाल आढळल्यास सुरक्षित अंतर ठेवून तातडीने वन विभागाला माहिती द्यावी. तसेच सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले. कापूस वेचणीचा हंगाम सुरू असल्याने महिला आणि शेतमजुरांना दररोज शेतात जावे लागत आहे. मात्र बिबट्याच्या वावरामुळे शेतात जाण्याबाबतच भीती निर्माण झाली आहे. सकाळच्या वेळी शेताकडे जाणाऱ्या महिला आणि मजुरांमध्ये विशेष चिंता असून रात्री शेतात पाणी देणे किंवा अन्य कामे करणेही धोकादायक वाटत आहे. त्यामुळे वन विभागाने संवेदनशील भागातील गस्त आणखी वाढवून अतिरिक्त पथके तैनात करावीत आणि बिबट्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवावे, अशी मागणी शेतकरी आणि शेतमजुरांकडून होत आहे. ग्रामस्थांनी रात्री एकट्याने शेतात जाणे टाळावे, सोबत टॉर्च आणि काठी ठेवावी, लहान मुलांना सुरक्षित ठेवावे आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी छत्रपती चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply