
अमळनेरच्या १२०० व्यापाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी दुष्काळात लादला तेरावा महिना; दुकाने खालीसाठी टांगती तलवार
व्यापाऱ्यांच्या कुटूंबियांच्या पोटावर पाय देऊन सत्ताधाऱ्यांचा नव्या वसुलीचा तोडपाणीचा ‘मास्टरप्लॅन’!
निवडणुकीत ‘तोडपाणी’ची बोंब ठोकणाऱ्यांच्याच गोटातील जळगाव,नंदुरबारच्या मोहरक्यांची ‘बॅगा’ भरण्याची लगबग!
अमळनेर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांसह सर्वांनाच दुष्काळाची झळ बसत असताना अमळनेरच्या व्यापारपेठेला उद्ध्वस्त करून १,२०० कष्टकरी व्यापाऱ्यांच्या कुटुंबांना देशोधडीला लावण्याचा एक अत्यंत घृणास्पद आणि सुनियोजित ‘वसुली पॅटर्न’ सध्या नगरपरिषदेत राबवला जात आहे. कराराची मुदत संपल्याचे केवळ तांत्रिक कारण पुढे करत, पालिका प्रशासनाने तब्बल १,२०० लहान-मोठ्या व्यावसायिकांच्या डोक्यावर दुकाने खाली करण्याची टांगती तलवार लटकवली आहे. कायद्याचा आणि नियमांचा बडगा दाखवून व्यापाऱ्यांच्या गळ्याला नख लावण्याचा हा प्रकार म्हणजे प्रशासकीय कारवाई नसून, सत्तेच्या आडून सुरू असलेली ‘उघड खंडणीखोरी आणि अर्थकारणाचा भस्मासुर’ असल्याचा जळजळीत आरोप आता शहरातील प्रत्येक कोपऱ्यातून होत आहे. या सुलतानी फर्मानामुळे संपूर्ण अंमळनेर शहर संतापाने पेटून उठले आहे.
राज्यसह अमळनेकरही दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघत आहेत. त्यात ऐन दुष्काळात शहरातील १,२०० लहान-मोठ्या व्यावसायिकांवर दुकाने खाली करण्याची वेळ नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी आणली आहे. आधीच व्यवसायाचे वांदे, व्यवसायासाठी घेतलेले कर्ज, कुटूंबाचे पोट भरण्यासाठी सुरू असलेली धावपळ, मुला, मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाचे नियोजन असताना दुष्काळाने सर्व गणिते बिघडवली आहेत. या आस्मानी संकटाशी समाना करीत असतानाच नगरपालिका आणि सत्ताधाऱ्यांनी पाठीत खंजीर खुपसावा असा दुकाने खाली कररण्याचा फतवा काढला आहे. यापूर्वीही शासन निर्देशानुसार कराराची मुदत संपल्यानंतर गाळेधारकांना औपचारिक नोटिसा दिल्या जात होत्या. मात्र, पिढ्यान्पिढ्या त्याच गाळ्यांत घाम गाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांकडून केवळ थकीत भाडे भरून घेतले जात असे आणि त्यांना दिलासा दिला जात असे. यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. “कोणत्याही परिस्थितीत दुकाने खाली करावीच लागतील,” अशी अरेरावीची भाषा वापरत काही विशिष्ट कार्यकर्त्यांमार्फत व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरवली जात आहे. त्यामुळे जगावे कसे, असा प्रश्न या व्यापाऱ्यांपुढे ठाकला आहे. ऐन दुष्काळात ही तुघलकीशाही नगरपालिकेने थांबली नाही तर मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा दिला जात आहे.
मते दिली विकासासाठी, पदरात पडला विश्वासघात!
अमळनेरच्या व्यापारपेठेला सुगीचे दिवस येतील, व्यवसाय सुरक्षित राहतील आणि स्थानिकांना बळ मिळेल, या मोठ्या आशेने शहरातील व्यापारी बांधवांनी पालिकेच्या सत्तेत मोठे मताधिक्य देऊन नेतृत्व निवडून दिले होते. मात्र, सत्तेची सूत्रे हाती येताच ज्यांनी निवडून दिले त्याच व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा घाट घातला जात आहे. “आम्ही ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांच्याकडूनच आज आमचा मोठा विश्वासघात होत आहे,” अशी जळजळीत भावना व्यापाऱ्यांमध्ये उमटत आहे.
‘गाव आपले, पालिका आपली; आणि लुटणारे ‘बाहेरचे’
सध्या अमळनेरच्या राजकीय आणि पालिका वर्तुळात एकाच प्रश्नाने जोर धरला आहे— “गाव आपले, पालिका आपली, व्यापारी संकुल आपले आणि व्यवसायही आमचाच; मग आमच्याच दुकानांवर टाच आणणारे नंदुरबार आणि जळगावचे हे ‘बाहेरचे’ सूत्रधार कोण?” पालिका कारभाराचे दोर सध्या नंदुरबार आणि जळगाव येथील मंडळींच्या हातात एकवटली आहे. अमळनेरच्या मातीशी किंवा येथील सामान्य कष्टकरी व्यापाऱ्यांशी कोणतीही भावनिक नाळ नसलेल्या या ‘बाहेरच्या’ म्होरक्यांचा डोळा केवळ मलईवर असल्याचा गंभीर आरोप होत आहे. आधी विकासाच्या गोंडस नावाखाली पालिकेची तिजोरी भरायची आणि नंतर त्यातून टक्केवारीचे गणित जुळवायचे, अशी ही नवी ‘कार्यपद्धती’ अंमळनेरकरांच्या बोकांडी बसवली जात आहे. याआधीच्या कोणत्याही नगराध्यक्षांच्या कार्यकाळात अशा प्रकारचे लुटीचे नाट्य कधीही रंगले नव्हते, याची आठवणही जुने जाणते नागरिक करून देत आहेत.
‘दाढीवाल्या’ नेत्यांच्या ‘तोडपाणी’च्या आरोपांची आता पोलखोल!
या संपूर्ण प्रकरणात राजकीय वर्तुळातील दुटप्पीपणाही आता चव्हाट्यावर आला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत इतरांच्या सांगण्यावरून विरोधकांवर ‘तोडपाणी’ आणि भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करत ज्यांनी रान उठवले होते, त्या ‘दाढीवाल्या’ नेत्यांच्याच गोटातून आता अंतर्गत वसुली आणि ब्लॅकमेलिंगचे उद्योग सुरू असल्याचा मार्मिक टोला जाणकारांकडून लगावला जात आहे. जी मंडळी कालपर्यंत इतरांकडे बोट दाखवून नैतिकतेचे डोस पाजत होती, त्यांच्याच छत्रछायेखाली आज तडजोडीच्या नावाखाली ‘बॅगा भरून’ माया गोळा करण्याचा धंदा सुरू झाल्याची चर्चा चौकाचौकांत रंगली आहे. भीती दाखवून व्यापाऱ्यांना झुकवायचे आणि पडद्यामागून आर्थिक तडजोडी करायच्या, हा ‘तोडपाणी’चा नवा पॅटर्न अंमळनेरकरांच्या चांगलाच लक्षात आला आहे.
संयमाचा बांध फुटण्यापूर्वी जागे व्हा; एकजुटीने लढा देण्याचे आवाहन
अमळनेरकर नागरिक आणि व्यापारी स्वभावतः शांत आणि सोशिक आहेत. त्यामुळेच आजवर ते हा सर्व अन्याय निमूटपणे सहन करत आहेत. परंतु, प्रशासनाच्या आडून सुरू असलेली ही आर्थिक पिळवणूक आणि दहशत अशीच सुरू राहिल्यास, या दबलेल्या संतापाचा कधीही मोठा उद्रेक होऊ शकतो, असा खणखणीत इशारा आता दिला जात आहे.
सध्याच्या या अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करण्यासाठी १,२०० व्यापारी बांधवांनी कोणत्याही ‘पँटर’च्या धमक्यांना किंवा दबावाला बळी न पडता एकजुटीची वज्रमूठ बांधणे अत्यंत गरजेचे आहे. व्यापाऱ्यांनी स्वतःहून अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचे धाडस दाखवले, तर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि सुजाण नागरिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यास अजिबात मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे घाबरून न जाता आता संघर्षाची तयारी ठेवा, हाच आपुलकीचा सल्ला सर्व स्तरांतून दिला जात आहे.

Leave a Reply