
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा : प्रमोद पाटील
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अमळनेरात विज्ञान जाणीव जागृती कार्यशाळा
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधन यांकडे सकारात्मकतेने पाहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांनी केले.
पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी हायस्कूल येथे “विज्ञान जाणीव जागृती कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रप्रमुख बी. डी. शिंदे (संभाजीनगर) होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विचारपीठावर संदीप घोरपडे, कार्यशाळेचे प्रशिक्षक सुरेश बोरसे (शिरपूर), रवींद्र चौधरी (पाचोरा), गुणवंत पाटील, सुनील पाटील, संजय पाटील, डी. ए. धनगर, दीपक महाजन, सुनील वाघमोडे, बापूराव ठाकरे, प्रा. अशोक पवार, अशोक बिऱ्हाडे, उमेश काटे आदी उपस्थित होते.
कार्यशाळेत अमळनेर शहरातील १५ माध्यमिक शाळांमधील सुमारे ८० विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. ‘पाण्याचा दिवा’ प्रज्वलित करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. प्रशिक्षक सुरेश बोरसे आणि रवींद्र चौधरी यांनी दिवसभरात १५ विविध विज्ञान प्रयोग तसेच प्रबोधनपर गीते विद्यार्थ्यांना शिकवली.
समारोप सत्रात वेदांत शेखर सोनार, मिलिंद राहुल पाटील, तेजस्विनी तुकाराम धनगर, मनन राकेश पाटील, तेजल ललित बडगुजर, प्रज्वल मोहन शिंपी, प्रथमेश अमोल जाधव, गायत्री देविदास पाटील, आयुष हरी महाजन आणि निनाद योगेश सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी ‘अग्नी खाणे’, ‘भूत गाडणे’, ‘बोट गोड करणे’, ‘पाण्याचा दिवा पेटविणे’, ‘आगकाडी न लावता दिवा पेटविणे’ आदी प्रयोग सादर करून त्यामागील वैज्ञानिक तत्त्वे स्पष्ट केली.
कार्यशाळेत प्रतिनिधिक स्वरूपात विद्यार्थी व शिक्षकांनी आपली मते व्यक्त करत अशा उपक्रमांमुळे अंधश्रद्धा दूर होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते, असे सांगितले.
जे प्रश्नांच्या कसोटीवर टिकते त्यावरच विश्वास ठेवणे अभिप्रेत
“चिकित्सा करावी, ‘का?’, ‘कसे?’ किंवा ‘कधी?’ असे प्रश्न विचारावेत. जे प्रश्नांच्या कसोटीवर टिकते त्यावरच विश्वास ठेवणे अभिप्रेत आहे; मात्र आज समाजातील मोठा वर्ग अवैज्ञानिक बाबींमध्ये गुरफटलेला दिसतो. माणूस जिज्ञासा, कुतूहल आणि चिकित्सक वृत्तीमुळेच प्रगत झाला,” असे गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील म्हणाले.

Leave a Reply