
समाजातील दुर्बलांना नवदृष्टी देण्याचे कार्य गौरवास्पद : पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे
अमळनेर (प्रतिनिधी) समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्यसेवा मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत मंगळग्रह सेवा संस्था आणि पनवेल (जिल्हा रायगड) येथील आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आयोजित करण्यात येणारे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर हे अत्यंत स्तुत्य व समाजोपयोगी कार्य असल्याचे गौरवोद्गार जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी काढले.
अमळनेर येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. श्रीकांत धिवरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मंगळग्रह सेवा संस्था आणि आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नांतून गेल्या काही वर्षांत बाराशेपेक्षा अधिक गरजू रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अनेकांच्या जीवनात पुन्हा प्रकाश आणण्याचे आणि त्यांना नवदृष्टी देण्याचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून अशा उपक्रमांना सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. शिबिरात नेत्रतज्ज्ञ डॉ. गुरुप्रीतसिंग राठोड, डॉ. विजय बाम्हणे, डॉ. अनिल मुंडे तसेच सहाय्यक प्राची गायकवाड आणि नेत्रा गोडवे यांनी रुग्णांची तपासणी केली. एकूण १३७ नागरिकांनी शिबिरात सहभाग घेतला. त्यापैकी सखोल वैद्यकीय तपासणीनंतर ७२ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. पात्र रुग्णांची आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय नोंदणी पूर्ण करण्यात आली. तत्पूर्वी रुग्णांच्या हस्ते नेत्रतज्ज्ञांचा सत्कार करण्यात आला.
मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने पात्र ठरलेल्या सर्व रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. हे सर्व रुग्ण सायंकाळी श्री मंगळग्रह मंदिरातून पनवेलकडे रवाना झाले. शस्त्रक्रियेनंतर आवश्यक वैद्यकीय सुविधा तसेच पुढील उपचारांची संपूर्ण व्यवस्था आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलकडून करण्यात येणार आहे.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, सेवेकरी आणि वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही अशा आरोग्यविषयक शिबिरांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते असून भविष्यातही समाजहिताचे आरोग्यविषयक उपक्रम सुरू राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहसचिव दिलीप बहिरम यांनी केले. संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेची पाहणी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सपत्नीक श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेला भेट देऊन तेथील गांडूळखत प्रकल्प, गोवरी निर्मिती विभाग, निसर्गसज्ज बैठक विभाग, गुलाब बाग, सेंद्रिय शेती तसेच गोसेवा विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंगळग्रह सेवा संस्थेच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली आणि पर्यावरण संवर्धन, सेंद्रिय शेती व गोसेवा यांचा समन्वय साधणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

Leave a Reply