स्मार्ट मीटरच्या प्रात्यक्षिकाने दूर केल्या शंका; ६५ फ्लॅटधारकांची संमती

अमळनेर (प्रतिनिधी) स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढते, या भीतीने साशंक असलेल्या नागरिकांचा दृष्टिकोन प्रत्यक्ष प्रात्यक्षिकानंतर बदलला. मोबाईलवर दर अर्ध्या तासाचा वीजवापर पाहता येतो, ही सुविधा समजताच सप्तश्रुंगी कॉलनीतील एन. टी. मुंदडा पार्क अपार्टमेंटमधील सर्व ६५ फ्लॅटधारकांनी स्मार्ट मीटर बसविण्यास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. महावितरणच्या जनजागृती मोहिमेला मिळालेला हा सकारात्मक प्रतिसाद ठरला.

महावितरणच्या अमळनेर शहर उपविभागातर्फे १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी एन. टी. मुंदडा पार्क अपार्टमेंटमध्ये स्मार्ट मीटर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबाडकर, सहाय्यक अभियंते हितेंद्र बडे, हेमंत सैंदाणे, मोहन नेवाळे, अभिजित डोईफोडे, संबंधित लाइन स्टाफ तसेच एनसीसी प्रतिनिधी मनोज गव्हाणे उपस्थित होते. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल जास्त येते, हा ग्राहकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मीटरची अचूकता, कार्यपद्धती आणि फायदे समजावून सांगितले. स्मार्ट मीटर बीआयएस प्रमाणित असून वीजवापराची अचूक माहिती उपलब्ध करून देते. मीटर रीडिंगसाठी कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नसून वीजवापराची माहिती थेट मोबाईलवर पाहता येते, असे स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमात ग्राहकांच्या मोबाईलमध्ये महावितरणचे ॲप डाउनलोड करून स्मार्ट मीटर बसविलेल्या घरांमधील दैनंदिन वीजवापराचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. दर अर्ध्या तासाला किती वीज वापरली जाते, कोणत्या वेळेत वापर वाढतो, याची माहिती ॲपवर कशी पाहता येते, हे समजावून सांगण्यात आले. घरातील वातानुकूलित यंत्रासह विविध विद्युत उपकरणांचा वापर नियंत्रित करून वीजबचत कशी करता येईल, याचेही प्रात्यक्षिक देण्यात आले. स्मार्ट मीटर ग्राहकांना मोफत बसवून दिले जाणार असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हे मीटर प्रीपेड नसून पूर्वीप्रमाणेच पोस्टपेड पद्धतीने दरमहा वीजबिल येणार आहे. मीटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास ते बदलून देण्यात येईल. सौरऊर्जा यंत्रणा असलेल्या ग्राहकांना एकाच मीटरद्वारे वीज आयात आणि निर्यातीची नोंद पाहता येईल, अशी माहितीही देण्यात आली. अधिक वीजबिल येणाऱ्या एका ग्राहकाच्या प्रकरणाचे उदाहरण देऊन उपकरणनिहाय वीजवापर कसा तपासता येतो आणि अनावश्यक वीजवापर कमी करून बचत कशी करता येते, हे अधिकाऱ्यांनी समजावून सांगितले. ग्राहकांच्या विविध शंकांचे निरसन केल्यानंतर उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे, कार्यक्रमानंतर अनेक ग्राहकांनी जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवून देण्याची मागणी केली. अखेरीस अपार्टमेंटमधील सर्व ६५ फ्लॅटधारकांनी स्मार्ट मीटर बसविण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *