
थकबाकीदारांना महावितरणचा अभय; व्याज-दंड पूर्ण माफ
अमळनेर (प्रतिनिधी) वीजबिलाच्या थकबाकीचा बोजा असलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने जाहीर केलेल्या ‘अभय योजना २०२६-२७’चा लाभ अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अमळनेर शहर उपविभागाने शहरभर जनजागृती मोहीम राबवली. थकबाकीवरील व्याज व दंडात १०० टक्के सवलत मिळणार असल्याची माहिती देत महावितरणच्या पथकाने थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचून योजनेचे महत्त्व पटवून दिले. या मोहिमेला ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला असून काही ग्राहकांनी जागेवरच योजनेसाठी नोंदणी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, महावितरणतर्फे १८ नोव्हेंबर रोजी शहरातील विविध भागांत ही मोहीम राबविण्यात आली. साने नगर, सखाराम महाराज मंदिर परिसर, पैलाड, ताडेपुरा, दगडी दरवाजाच्या आतील सराफ बाजार, वाडी चौक, तांबेपुरा, कुंभारवाडा, गलवाडे रोड, गांधलीपुरा, चोपडा रोड, ढेकू रोड यांसह शहरातील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे योजनेची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातूनही संपूर्ण शहरात प्रचार करण्यात आला.
केवळ घोषणांपुरती मोहीम मर्यादित न ठेवता ग्राहकांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक शाखा अभियंता आणि जनमित्रांनी घरोघरी भेटी देऊन योजनेचे स्वरूप, पात्रता आणि मिळणाऱ्या सवलती समजावून सांगितल्या. थकबाकीदार ग्राहकांना व्याज व दंडाच्या रकमेत १०० टक्के सवलत मिळणार असल्याने या संधीचा लाभ घेऊन थकबाकीचा प्रश्न निकाली काढण्याचे आवाहन करण्यात आले. या जनजागृतीमुळे ग्राहकांमध्ये योजनेविषयी माहिती पोहोचली असून काही ग्राहकांनी मोहिमेदरम्यानच नोंदणी करून लाभ घेण्यास पुढाकार घेतला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबाडकर, सहाय्यक अभियंता हेमंत सैंदाणे, हितेश बडे, मोहन नेवाळे, अभिजीत डोईफोडे तसेच सर्व लाइन स्टाफच्या सहकार्याने ही जनजागृती मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.

Leave a Reply