
राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी मोहम्मद आरिफ भाया तेली यांची नियुक्ती
आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीनुसार निवड

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आरिफ (शफी) भाया तेली यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे माजी मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
मोहम्मद आरिफ (शफी) भाया तेली हे अमळनेर नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती मोहम्मद शफी भाया तेली यांचे चिरंजीव असून, सामाजिक, धार्मिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण समाजकार्याची शहरात विशेष दखल घेतली जाते.
राजा-ए-मुस्तफा सोशल ग्रुपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. तसेच सध्या ते अमळनेर शहर ईदगाह मुस्लिम कब्रस्तान समितीचे संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
या नियुक्तीबद्दल आमदार अनिल भाईदास पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार, अमळनेरच्या माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका जयश्री पाटील, तालुकाध्यक्ष भगवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोहम्मद आरिफ (शफी) भाया तेली यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल नेतृत्वाचे आभार मानले. पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply