डॉ. अमोघ जोशी यांच्या ‘कालस्वर’ पुस्तकाचे प्रकाशन

अमळनेर (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘छंद विठ्ठलाचा’ या भक्तिमय कार्यक्रमात विठ्ठल नामाचा अखंड गजर, समाजसेवेचा संदेश आणि सुरेल अभंगांचा मनोहारी संगम अनुभवायला मिळाला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेरचे सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अमोघ जोशी लिखित ‘कालस्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमात भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. जिव्हाळा फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतमजूर कुटुंबातील होतकरू मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा विशेष गौरव करण्यात आला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देत त्यांना स्वावलंबी बनविण्याचे कार्य संस्था सातत्याने करीत असून, या उपक्रमातून अनेक विद्यार्थिनींनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थिनींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समाजपरिवर्तनासाठी शिक्षण हेच प्रभावी माध्यम असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अमोघ जोशी यांचे अभंग गायन. वैद्यकीय क्षेत्रातील व्यस्त दिनचर्या सांभाळतानाच त्यांनी संगीताची अविरत साधना जोपासली असून, स्वतः रचलेल्या विविध विठ्ठल अभंगांचे त्यांनी सुमधुर सादरीकरण केले. त्यांच्या भक्तिरसपूर्ण गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि सभागृह विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेले. याच प्रसंगी डॉ. अमोघ जोशी यांच्या ‘कालस्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. भक्ती, साहित्य आणि संगीत यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या पुस्तकाचे उपस्थितांनी उत्स्फूर्त स्वागत केले. डॉ. अमोघ जोशी यांनी रचलेल्या अभंगांमधून विठ्ठलभक्तीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी प्रयत्न होत असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.

या कार्यक्रमास मंजुषा नागपुरे, माजी आमदार सिद्धार्थ शिरोळे, अंजली पाटील, जिव्हाळा फाऊंडेशनच्या अध्यक्षा ॲड. शर्वरी मुठे, राजेंद्र मुठे, प्रा. मिलिंद जोशी, प्रा. शारंगधर साठे, डॉ. संगीता पारनेरकर, कार्यक्रमाचे प्रायोजक प्रवीण बढेकर, अमर मांजरेकर, डॉ. अमोघ जोशी, डॉ. आयुषी जोशी, डॉ. अविनाश जोशी, डॉ. सुषमा जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, विठ्ठलभक्त आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भक्ती, साहित्य, संगीत आणि समाजसेवा यांचा संगम घडविणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *