अमळनेर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात! कापूस, मका पिकांची अवस्था बिकट; अनेक शेतकऱ्यांनी पिकांवर फिरवला रोटाव्हेटर

आमदार अनिल पाटील यांची बांधावर जाऊन पीक पाहणी; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यात पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पावसाअभावी कापूस पिकाची वाढ खुंटली असून मका पिकाला कणसेच न लागल्याने अनेक ठिकाणी पीक पूर्णपणे सुकून गेले आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, काही शेतकऱ्यांना उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवून ते जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरण्याची वेळ आली आहे.

तालुक्यातील सुमारे ६० टक्के क्षेत्र कोरडवाहू व भुराट स्वरूपाचे असल्याने या भागातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उर्वरित सुमारे ४० टक्के क्षेत्र काळ्या कसदार जमिनीचे असून या भागात काही प्रमाणात पीक वाचण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र सध्याचा पाऊसही अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तर उर्वरित कापूस पिकावरही संकट ओढावण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पावसाने आता हजेरी लावली असली तरी पिकांची वाढीची महत्त्वाची अवस्था उलटून गेल्याने या पावसाचा अपेक्षित फायदा होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकीकडे पावसाअभावी नुकसान, तर दुसरीकडे झालेल्या खर्चाची भरपाई कशी करायची, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

आमदार अनिल पाटील यांची बांधावर जाऊन पाहणी

या गंभीर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी तालुक्यातील शेतांवर जाऊन कापूस व मका पिकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकांची सद्यस्थिती, झालेला खर्च, अपेक्षित उत्पादन आणि पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.

यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले, “अमळनेर तालुक्यात खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकरी मोठ्या संकटात आहे. या परिस्थितीत शेतकरी बांधवांना आधार मिळवून देण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्नशील आहोत.”

दरम्यान, आमदार पाटील यांनी नुकतेच मुख्यमंत्री तसेच संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र देऊन अमळनेर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.

यावेळी मार्केटचे माजी संचालक अनिल शिसोदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, महेश पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *