
विठ्ठल-रुख्माईच्या कृपाआशीर्वादाने संत सखाराम महाराज वाडी मंदिराचे होणार नवनिर्माण आमदार अनिल पाटील यांचा विश्वास
अमळनेर (प्रतिनिधी) विठ्ठल-रुख्माईच्या कृपाआशीर्वादाने आणि शासनाच्या मदतीने संत सखाराम महाराज वाडी मंदिराचे भव्य नवनिर्माण होऊन वारकरी संप्रदायातील हे प्रमुख धार्मिक स्थळ पुन्हा पूर्ववैभवाने उजळून निघेल, असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला. वाडी मंदिराला भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी भडगाव येथे प्रत्यक्ष वारीत सहभागी होत प. पू. संत प्रसाद महाराज यांची भेट घेऊन मंदिराच्या पुनर्बांधणीबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी मंदिराचे विश्वस्त, बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंदिर परिसराची पाहणी केल्यानंतर आमदार अनिल पाटील म्हणाले की, संत सखाराम महाराज वाडी संस्थान हे केवळ अमळनेरचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराचे नवनिर्माण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सध्या संस्थान पर्यटन विभागाच्या ‘ब’ वर्गात असून, त्याच विभागामार्फत निधी उपलब्ध करून घेण्याबरोबरच संस्थानाचा ‘अ’ वर्गात समावेश करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. तसेच राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी सर्वोच्च स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना त्यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. विश्वस्त मंडळाशी पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करताना आमदार अनिल पाटील यांनी आगीच्या घटनेच्या दिवशी तत्परतेने कार्य करणाऱ्या अग्निशमन विभागाचे कौतुक केले. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, संस्थानचे राजेंद्र भामरे, महेश कोठावदे, उदय देशपांडे, अतुल कुलकर्णी, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी साधला संवाद

वाडी संस्थानातील दुर्घटनेमुळे ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक वारशाचे मोठे नुकसान झाले असून, लाखो वारकरी व भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या नवनिर्माणासाठी शासन निश्चितच मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प. पू. संत प्रसाद महाराज यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधताना दिली.
आमदार अनिल पाटील हे भडगाव येथे संत प्रसाद महाराजांना भेटण्यासाठी गेले असताना त्यांच्या मोबाईलवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाराजांशी संवाद साधला. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी विशेष बाब म्हणून १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याची माहिती दिली. तसेच विधिमंडळात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन उपस्थित करून आपत्कालीन निधीचीही मागणी केली असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शासन याबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर संत प्रसाद महाराज यांनी, साक्षात विठ्ठल माऊली आणि लाखो भक्तगण आपल्या पाठीशी असल्याने कोणतीही चिंता नसल्याचे सांगितले. आमदार अनिल पाटील यांनी महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर महाराज दिंडीसह पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply