शेती पंपांसाठी अखंड वीजपुरवठा द्या; शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्या : आमदार अनिल पाटील

महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठकीत वीजपुरवठा, तक्रार निवारण व तांत्रिक अडचणींवर केली चर्चा

अमळनेर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेत शेती पंपांना अखंड व दर्जेदार वीजपुरवठा करण्याची मागणी केली. पेरणी, रोपलावणी आणि पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना नियमित व खंडमुक्त वीज मिळावी यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीत शेती पंपांच्या वीजपुरवठ्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना सध्या वीज खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे तसेच भारनियमनाचा फटका बसत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी शेती पंपांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.

रोस्टिंग किंवा भारनियमनाचा परिणाम शेती पंपांवर होऊ नये यासाठी स्वतंत्र फीडरद्वारे किंवा ठराविक वेळेत किमान आठ तास दर्जेदार वीजपुरवठा देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच 220  केव्ही आणि 33 केव्ही उपकेंद्रांवरील तांत्रिक दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून ट्रिपिंग आणि वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी करण्याच्या सूचना दिल्या.

शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे यासारख्या तक्रारी तातडीने सोडविण्यासाठी स्थानिक स्तरावरील यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी बैठकीत नमूद केले.

यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले, “शेतकरी हा देशाचा कणा आहे. पेरणीच्या काळात त्यांना वीजेची सर्वाधिक गरज असते. त्यामुळे महावितरणने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन त्यांना अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा.” महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आमदारांच्या सूचनांची नोंद घेत आवश्यक उपाययोजना लवकरात लवकर राबविण्याचे आश्वासन दिले. या बैठकीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *