पैलाड भागात उघड्या गटारी, कचऱ्याचे ढीग, सांडपाणी आणि दुर्गंधीने पैलाड भागाती धोक्यात

भग्न स्वच्छतागृह, बंद दवाखानामुळे  नागरिकांच्या संतप्त भावना

 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पैलाडसह परिसरात स्वच्छता, आरोग्य व पायाभूत सुविधांबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उघड्या गटारी, कचऱ्याचे ढीग, सांडपाणी आणि दुर्गंधीचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. तसेच भग्न स्वच्छतागृह, बंद दवाखानामुळे नागरिकांचा संतप्त अनावर झाला असून आम्ही करभरत असूनही आमच्या वाटेला हे का येतेय असा ही सवाल ते उपस्थित करीत आहे.

पैलाड हा शहरातील रहिवासदृष्ट्या अतिशय मोठा व विविध दृष्टींनी महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. तेथील पांढरी परिसरातील (वॉर्ड क्र. 11) नागरिकांना अस्वच्छता आणि अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कचरा टाकू नये, असा फलक लावलेला असताना तेथे कचऱ्याचा डेपो तयार झालेला आहे. या भागातील रस्त्यांच्या कडेला उघड्या गटारी असून, त्यात प्लास्टिकचा खच, बांधकामाचा कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक कमालीचे हैराण आहेत. याच ठिकाणी मोकाट जनावरांचाही वावर दिसतो. मोकाट जनावरे प्लास्टिक खात असल्याने त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधितांकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने दुर्गंधीसह राहावे लागते. त्यामुळे प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर अमळनेर-पारोळा या वर्दळीच्या रस्त्यावरील मुख्य मोठी गटार पूर्णपणे सांडपाणी, गाळ आणि प्लास्टिक कचऱ्याने भरलेली आहे. गटारीच्या काठावरील दाट काटेरी झाडे- झुडपे झुकली आहेत. तेथील उकिरड्यावर मेलेली कुत्रे, मांजरी देखील पडलेली पाहावयास मिळाली. यामुळे तेथे अतिशय तीव्र दुर्गंधी होती. उघड्या गटारीत गाळयुक्त काळपट पाणी साचल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. नियमित साफसफाई व दुरुस्ती होत नसल्याने तेथील नागरिकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागते.

 

स्वच्छतागृहाची दैनामुळे गैरसोय

 

पैलाड भागातील महिला व पुरुषांसाठी उभारलेले सार्वजनिक स्वच्छतागृह पाणी व वीज नसल्यामुळे वापरायोग्य राहिलेले नाही. पुरुषांचे स्वच्छतागृह दरवाजे तुटलेले, परिसरात गवत व काटेरी झुडपे वाढलेली, भिंतींची रंगसफेदी उखडलेली कुठल्याही परिस्थितीत वापरण्यायोग्य राहिलेली नाही. आजूबाजूला कचरा व शेणाचे मोठ-मोठे ढिगारे साचल्याने घाण व दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत. पालिका प्रशासन मात्र मस्त आहे. पैलाड भागातील नागरिकांच्या आरोग्याशी अक्षरश: संतापजनक खेळ खेळला जातो आहे की काय, असे चित्र आहे.

 

भग्नावस्थेतील आयुर्वेदिक दवाखाना

 

पैलाड भागातील शिवाजीनगरातील मुख्य चौकात असलेला नगरपालिकेचा आयुर्वेदिक दवाखाना मागील तब्बल 20 वर्षांपासून पडीत अवस्थेत आहे. जीर्ण झालेली इमारत, गंजलेले दरवाजे, तडे गेलेल्या भिंती धूळ-खात पडलेल्या आहेत. यामुळे पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे. शिवाय नागरिकांना लहान-सहान उपचारांसाठीही दूरवर जावे लागत असून ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.

 

80 फुटी रस्ता अडकला झाडांच्या विळख्यात

 

मागील बाजूस असलेला 80 फुटांचा रस्ता झाडांच्या विळख्यात अडकला आहे. त्यामुळे तो अरुंदही झाला आहे. गटारीअभावी सांडपाणी चक्क रस्त्यावर येते. गटारींची व्यवस्था नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर साचते आहे. त्यामुळे चिखल, दुर्गंधी आणि अपघातांचा धोका वाढला आहे. शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करताना मोठी अडचण निर्माण होत आहे.

 

फक्त घोषणा प्रत्यक्ष कारवाई कधी ?

 

स्वच्छतेच्या घोषणा आणि फलक लावून जबाबदारी संपते का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. नियमितपणे कचरा उचलला जाणे, गटारींची स्वच्छता होणे, स्वच्छतागृहाची दुरुस्ती होणे, बंद दवाखाना सुरू करणे आणि मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवणे या बाबींकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. पैलाड भागातील या परिस्थितीमुळे प्रशासनाच्या एकूणच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रशासन प्रत्यक्षात ठोस कारवाई केव्हा करेल? घाणीच्या, दुर्गंधीच्या व भग्नावस्थेच्या दुष्टचक्रातून आमची केव्हा सुटका होईल? असा प्रश्न पैलाडवासी उपस्थित करीत आहेत.

 

अंगणवाडी भरते भाड्याच्या खोलीत

 

पैलाड भागात अंगणवाडीसाठी असलेली वास्तू पूर्णत: भग्न झाली आहे. त्यामुळे भाड्याच्या खोलीत अंगणवाडी सुरू आहे. पालिकेने सदर अंगणवाडीची डागडुजी करून तिला वापरण्यायोग्य करणे गरजेचे आहे. अंगणवाडीबाहेर मुलांना खेळण्यासाठी बगिचाही करता येण्यासारखे आहे. प्राथमिक स्वरूपातील शिक्षणाची समाधानकारक सोय नसल्याने अनेक पालकांना त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असूनही न परवडणारी फी भरून खासगी शाळांमध्ये बालकांना रिक्षातून पाठवावे लागते. बालके घरी येईपर्यंत पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो.

 

मोठे जनआंदोलन उभारणार

 

मी पैलाड भागातील विविध समस्यांसंदर्भात आरोग्य विभागाचे लक्ष वेधण्याचा वारंवार प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यांच्याकडून मला कोणताही ठोस व सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. काहीतरी ताथूर-मातूर काम करून संबंधित निघून जातात. मी पालिकेत विरोधी गटात असल्यामुळे जाणून-बुजून माझ्या प्रभागाकडे दुर्लक्ष केले जात आहे की काय? अशी शंका मला येऊ लागली आहे. खरेतर शहरातील सर्वच नागरिक करदाते आहेत. पालिकेने सर्वांना सर्व प्रकारच्या समान सोयी-सुविधा दिल्या पाहिजेत. आमच्या सहनशक्तीचा अंत न पाहता पालिकेने तत्काळ युद्धपातळीवर पैलाड भागातील सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील व साफसफाईच्या सर्व समस्या सोडविल्या पाहिजेत. अन्यथा मला मोठे जनआंदोलन करणे भाग पडेल.

विजय कहारू पाटील गरसेवक, अमळनेर.

 

आठ दिवसांत सर्व कामे पूर्ण करू

 

पैलाड भागातील पांढरी परिसरात ‌‘कचरा टाकू नये‌’, असा फलक लावून सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही तेथील काही नागरिक घंटागाडीचा वापर करत नाहीत. शिवाजीनगर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. स्वच्छतागृहाची लवकरच दुरुस्ती करून ते वापरासाठी सुरू करण्यात येईल. पारोळा रस्त्याकडील नाला जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात येईल. तसेच काटेरी झाडे-झुडपे काढून जंतुनाशकांची फवारणी करण्यात येईल. येत्या आठ दिवसांत सर्व कामे पूर्ण करण्यात येतील.

किरण कंडारे स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद, अमळनेर.

 

दंडात्मक कारवाई करण्यात येईल

 

पैलाड परिसरातील बंद दवाखान्याबाबत मला माहिती नाही. साफसफाईबाबत आज देखील बैठक घेण्यात आली. आज आपण सांगितलेल्या ठिकाणी आमचे एस.आय. व संबंधित मुकादम यांना पाठवून स्वच्छता करण्याचे आदेश देतो. तेथील साफसफाई तसेच जी काही दुरुस्तीची आवश्यकता असेल ती पूर्ण करण्यात येईल. जे नागरिक मोकळ्या जागेत कचरा टाकतील त्यांच्यावर कारवाईसाठी आम्ही एक पथक तयार केले आहे. संबंधितांना नोटीस देऊ अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

गणेश शिंदे मुख्याधिकारी, नगर परिषद, अमळनेर.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *